महायुतीमधील सध्यस्थिती
मोदी लाटेत युवा नेतृत्व म्हणून २०१९ ला मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना भरभरून मतदान केलं. राजू शेट्टी तब्बल ९५ हजार मतांनी पराभूत झाले. मात्र याचवेळी शिवसेनेने भाजपला दूर करत काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केल्याने धैर्यशील माने महाआघाडी सोबत होते. मात्र शिंदेंनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडानंतर भाजप वरिष्ठांकडून विद्यमान खासदारच २०२४ ला उमेदवार असतील असा शब्द मिळाल्याने, माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटासोबत महायुतीमध्ये सामील झाले.
तर भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार सध्या धैर्यशील माने यांचा मतदार संघात नसलेला संपर्क आणि उद्धव ठाकरे यांना दिलेला धोका यामुळे मतदार संघात धैर्यशील माने यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या उमेदवारीच्या शब्दामुळे महायुतीचे उमेदवार पुन्हा धैर्यशील मानेच असतील अशी शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील विद्यमान खासदारच महायुतीचे उमेदवार असतील असे सांगितले होते. तसेच महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपूर्ण ताकत लावली जाईल असेही मुश्रीफ म्हणाले होते.
मात्र असे असले तरी याच मतदारसंघात भाजपकडून इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी ही तयारी सुरू केली आहे. तसेच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी देखील भाजपकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
महाविकास आघाडीतील स्थिती:
शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले मतदारसंघात या दोन्ही पक्षांची ताकद कमी झाली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून या जागेवर आपला दावा सांगण्यात आला असला तरी, ताकदीचा उमेदवार नसल्याने उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी इस्लामपूर आणि शिराळा भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्याने ठाकरे गटाकडून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी सुरू आहे.
या संदर्भातील चर्चा महाविकास आघाडीमध्ये सध्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. मात्र ही भेट राजकीय नव्हती असे स्पष्टीकरण राजू शेट्टी यांनी दिले असले तरी या भेटीवरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकांनी नाराजी दर्शवली होती. या आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतल्यानंतर त्याचा फायदा महाविकास आघाडीला किती झाला? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला गेला होता.
उलट महाविकास आघाडीचा फायदा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेट्टी यांनी मोठी केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांकडून होत असून कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र जर राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीचे बळ दिले तर महायुतीची एक जागा कमी होईल यामुळे महाविकास आघाडी आपली ताकद राजू शेट्टीच्या मागे देण्याच्या तयारीत आहे.
गेल्या तीन लोकसभा निवडणुकीचा इतिहास:
एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २००९ ला सुरुंग लावला. २००४ ला विधानसभा सदस्य असलेल्या राजू शेट्टी यांनी विधानसभा सदस्याचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच २००९ ला अपक्ष म्हणून विजय मिळवत लोकसभेत गेले. तर २०१४ ला मोदी लाटेत भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीच्या विरोधात विजय खेचून आणला. मात्र, दीड वर्षातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, खासदार राजू शेट्टी यांनी युती सोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जवळ केले.
२९१४ पासून राजू शेट्टी यांनी कधी भाजप आणि शिवसेना, तर कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी सोयीस्कर भूमिका घेतल्याने मतदारांना आवडले नाही आणि २०१९ च्या निवडणुकीत आघाडीच्या पाठिंबावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शेट्टींना पराभवाचा सामना करावा लागला होता.
यामुळे यंदा राजू शेट्टी हे एकला चलो रे च्या भूमिकेत असून त्यांनी आघाडी आणि युती सोबत फारकत घेत, गेल्या पाच वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा ही विधानसभा मतदारसंघात दौरा, आंदोलन आणि ऊस दरासाठी काढलेली पदयात्रा या माध्यमातून चांगला जनसंपर्क तयार केला आहे. सत्तेत असो किंवा नसो राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सोबतची नाळ कायम ठेवल्याने सध्या या मतदारसंघात राजू शेट्टींबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
त्यामुळे राजू शेट्टींनी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी त्यांनी तयारी केली असून प्रचाराचा नारळ देखील त्यांनी फोडला आहे. जर येथे तिरंगी लढत झाली तर याचा फायदा भाजपला होईल यामुळे महाविकास आघाडीने आपला उमेदवार न देता राजू शेट्टी यांना आपला पाठिंबा जाहीर करत महायुतीची जागा कशी कमी होईल याकडे जास्त लक्ष देताना दिसून येत आहे. यामुळे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूक २०१९ प्रमाणे राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा सामना पाहायला मिळणार आहे.
लोकसभा मतदारसंघाची रचना :
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा आहेत.
कोल्हापूर जिल्हा :
१. शाहुवाडी विधानसभा मतदारसंघ : विनय विलासराव कोरे (जनसुराज्य पक्ष)
२. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ: राजू (बाबा) जयवंतराव आवळे ( काँग्रेस)
३. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ : प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे ( ताराराणी पक्ष)
४. शिरोळ विधानसभा मतदारसंघ :राजेंद्र शामगोंडा पाटील(यड्रावकर) (अपक्ष)
सांगली जिल्हा :
५. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ: जयंत राजाराम पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
६. शिराळा विधानसभा मतदारसंघ: मनसिंग फत्तेसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय आढावा घेतले असता आमदार विनायक कोरे ,प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते सध्या महायुती सोबत आहेत. तर राजू बाबा आवळे, जयंत पाटील आणि मनसिंग नाईक हे महाविकास आघाडी सोबत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसोबत समसमान ताकद पहायला मिळत असून या मतदारसंघात मराठा समाज, जैन समाज आणि लिंगायत समाजाची व्होट बँक मोठ्या प्रमाणात आहेत.
कोण आहेत इच्छुक उमेदवार:
१. महायुती ( धैर्यशील माने ( शिवसेना शिंदे गट) , राहुल आवाडे (भाजप), सदाभाऊ खोत( भाजप) )
२. महाविकास आघाडी- ( प्रतीक पाटील ( राष्ट्रवादी) , मुरलीधर जाधव ( ठाकरे गट))
३. अपक्ष / स्वाभिमानी पक्ष- ( राजू शेट्टी)