चित्रा वाघ यांनी या संदर्भात नवं ट्वीट केलं आहे. ‘माझ्या व माझ्या कुटुंबाविरोधात गलिच्छ भाषा वापरली जात आहे. कोणीही काहीही म्हणालं तरी मी कुणाच्या कुटुंबातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको किंवा बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही,’ असा टोला वाघ यांनी मेहबूब शेख यांना हाणला आहे.
‘विरोधकांकडील मुद्दे संपले की एखाद्या महिलेच्या बाईपणाला व तिच्या कुटुंबाला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडं सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेच मुद्दे आहेत, असं त्या म्हणाल्या. ‘या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा, मी तुमच्यासोबत आहे,’ असं आवाहन त्यांनी महिलांना केलं आहे.
कसा सुरू झाला वाद?
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी देवरे यांना पाठिंबा दिला होता. तसंच, नीलेश लंके यांच्यावर आरोप केले होते. मेहबूब शेख यांनी लंकेंवरीला आरोपांना उत्तर देताना वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो,’ असं शेख म्हणाले होते. तसंच, ‘लाचखोराची बायको’ असं शेख म्हणाले होते.
शेख यांच्या या टीकेला वाघ यांनी उत्तर दिलं होतं. वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण, मी पीडितांच्या पाठीशी उभी राहतेय. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे, काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा…. कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,’ असं ट्वीट वाघ यांनी केलं होतं.
वाघ यांनाही शेखही यांनीही तितक्याच सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. ‘आडनाव वाघ असल्यानं कोणी वाघ होत नाही. आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॅागबाजी सोडा आणी आपल्या नवऱ्यावर ५ जून २०१६ ला कार्यवाही झाली, तेव्हा सरकार कुणाचं होत ते सांगा? त्यांनी कोणत्या बुद्धीनं कारवाई केली होती याच उत्तर द्या,’ असं आव्हान शेख यांनी दिलं होतं. ‘तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलं आहे. कुणाला विचारायची आवश्यकता नाही. जसं आम्ही म्हणतो की आमची नार्को करा, तशी तुमच्या नवऱ्याचीही नार्को करा,’ असं शेख म्हणाले होते.