हायलाइट्स:
- चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्घाटन
- नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा रंगणार
- शिवसेना खासदारानं लगावला राणेंना टोला
सिंधुदुर्गः चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन (chipi airport inauguration) पुन्हा एकदा शिवसेना- राणे यांच्यात जुंपली आहे. नारायण राणेंनी (Narayan Rane) चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आवश्यक नाही, असं विधान केलं होतं. त्यानंतर नितेश राणेंनी बाप असावा तर असा, असं विधान केलं होतं. या विधानावर शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राणे पिता- पुत्रांवर जोरदार टीका केली आहे. ‘चिपी विमानतळ हा प्रकल्प संपूर्णपणे महाराष्ट्राचा आहे. केंद्र सरकार हे केवळ परवाना देण्याचे काम करतात. आता जे हुशारकी करत आहेत त्यांना एक लक्षात असलं पाहिजे की, मुख्यमंत्र्यांना बोलवायची गरज नाही हे सांगणारे तुम्ही कोण? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या. अगदीच माहिती नसेल तर अमित शहांना विचारा. काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. बाप असावा पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नसावा,’ अशा शब्दांत विनायक राऊतांनी राणेंवर टीका केली आहे.
वाचाः बेळगाव निकाल: भाजपने ‘ही’ मागणी मान्य करावी; संजय राऊतांनी दिलं थेट आव्हान
‘नारायण राणेंनी १९९०मध्ये विमानतळाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ते २२ वर्ष गायब होते. तुम्हाला चिपी विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. मी आणि वैभव नाईक यांनी पाहणी केली. २०१४ मध्ये आम्ही एमआयडीसीकडे विमानतळाचा स्टेट्स मागितला. तेव्हा त्यांनी अहवाल दिला. फक्त १४ टक्के काम झालं होतं. माती काढून खोदून ठेवली होती. मी, वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न केला. केसरकरांनी डीपीसीतून निधी दिला. मी स्ट्रिट लाईटसाठी निधी दिला. सुभाष देसाईंनीही निधी दिला. १००सुरक्षा पोलीस दिले. शंभुराजे देसाईंशी मिटिंग केली. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. पण श्रेयाची फुशारकी मिरवणाऱ्या राणेंनी तर अजिबात श्रेय घेऊ नये. बाप बाप म्हणणाऱ्या नितेश राणेंना तर अजिबात नाही. ज्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नांनी कोकण रेल्वे सुरू झाली त्यांचेही फोटो कधी रेल्वेवर लागले नाहीत. आम्ही गणेशोत्सवासाठी ट्रेन सोडल्या पण कधी फोटो लावले नाहीत. आणि हे ट्रेनवर पोस्टर लावून फिरत आहेत,’ अशी टीका विनायक राऊतांनी केली आहे.
वाचाः ‘मराठी माणसाने १५ कोटींच्या ‘पेंग्विन विकासाचे मॉडल’ नाकारले’
वाचाः भाजप खासदाराच्या सुनेला मारहाण?; राष्ट्रवादीकडे मदत मागत केला गंभीर आरोप