एमपीएससीच्या जाहिरातीची पूर्व परीक्षा सप्टेंबर २०२२ मध्ये पार पडली. मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये पार पडली. मुलाखत प्रक्रिया डिसेंबर २०२३ मध्ये संपन्न झाली. विकास कुकडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गांधी विद्यालय शाखा कृषी सारथी कॉलनी परभणी या शाळेतून झाले आहे. अकरावी आणि बारावीचे शिक्षण संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय परभणी येथून घेतले. ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथून कला शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्यांनी पुणे या ठिकाणी जाऊन पुढील शिक्षण घेतले.
विकास हे २०१८ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून महाराष्ट्र शासनाच्या वस्तू आणि सेवा कर विभागात कर सहाय्यक या पदावर रुजू आहेत. एम.पी.एस.सी.च्या जाहिरातीतील पदांचा विचार करता त्यांची तहसीलदार, मुख्याधिकारी (नगर परिषद), शिक्षणाधिकारी तसेच सहायक राज्यकर आयुक्त यापैकी कुठल्याही पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आई-वडील, बहिणी व भाऊ यांची मोठी प्रेरणा आणि पाठबळ असल्यामुळेच या यशाला गवसणी घालता आली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांचे वडील कोंडीबा कुकडे हे इलेक्ट्रिशियन असून शहरासह ग्रामीण भागातील विद्युत दुरुस्ती, लाईट फिटींगची कामे करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
त्यांनी मुले-मुलींना शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्यांची एक मुलगी इंजिनिअर तर दुसरी मुलगी शिक्षिका बनली आहे. यापुर्वी देखील यश मिळवत कर सहाय्यक पदाची नोकरी मिळाली खरी मात्र विकास यांचे समाधान झाले नाही. मोठा अधिकारी होण्याची जिज्ञासा बाळगून त्यांनी नोकरी करत पुन्हा अभ्यासात स्वतःला झोकून दिले. कुशाग्र बुद्धिमत्ता, ध्येयाचा ध्यास, त्यासाठी केलेले परिश्रम कामी आले. जिद्द, ध्यास आणि परिश्रम ज्यांच्या अंगी असते ते कधीच अयशस्वी होत नाहीत. विकास कुकडे यांच्या बाबतीतही हेच घडले. त्यांनी अखेर करून दाखवले. यंदा त्यांनी यशाचे शिखर गाठले. पंखांत बळ असेल तर कितीही उंच भरारी मारता येते, हे त्यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
ग्रामीण भागात गुणवत्ता भरलेली असते. परंतु त्याचा योग्यप्रकारे वापर करण्यात आपण कमी पडतो. ग्रामीण, आर्थिक स्थिती असे काही नसते. ध्येय महत्त्वाचे असते. ध्येयाचा ध्यास केला की यश हमखास मिळतेच. ग्रामीण भागातील तरुणांनी कोणत्याच प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. चिंता कोणतीही असो, त्याचा मुकाबला करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे, असे विकास कोंडिबा कुकडे यांनी सांगितले आहे.