सतेज पाटलांचा सरप्राईज चेहरा संभाजीराजे छत्रपती यांचा?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची जागा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघावर काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे मात्र ही जागा कोणाला जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे. तसेच या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी येथे सरप्राईज उमेदवार असेल असे जाहीर केल्यापासून आणि संभाजीराजे छत्रपती यांनी इच्छा महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कोल्हापूर लोकसभेचे वातावरण जागा वाटपाआधीच तापू लागलं आहे.
अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी बोलताना माझ्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते संपर्कात असून स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहेत. सध्या आमचं स्वराज्य जोरात सुरू आहे आणि लोकसभेला अद्याप वेळ आहे. वेळ आलं की चित्र स्पष्ट होईल. माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे असे म्हणत ते कोल्हापूरमधूनच लढण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले. यामुळे आगामी काळात ही जागा जर काँग्रेसला गेली तर काँग्रेस ही जागा संभाजीराजेंना सोडणार की अन्य काही राजकीय समीकरण तयार होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
कार्यकर्त्याची मागणी, कोल्हापुरात कार्यक्रमाचे आयोजन
संभाजीराजे छत्रपती यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आणि महाविकास आघाडी सोबत चर्चा सुरू असल्याच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. अशातच छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातही संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.
यानंतर काल आयोध्या मधील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिरात संपूर्ण छत्रपती घराण्यासह पूजेमध्ये सहभागी झाले आणि संध्याकाळी पंचगंगा घाटावर देखील पंचगंगेची आरती करत दीपोत्सवाचं आयोजन केलं. यामुळे संभाजीराजे छत्रपती आता कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.