भास्कर जाधव यांच्याकडून तोंडभरून कौतुक, रश्मी ठाकरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले

नाशिक : उद्धवसाहेबांना आवडणार नाही पण मी आज रश्मी वहिनींवर भाषण करणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आपल्या संबोधनास सुरूवात केली. गेले अनेक दिवस रश्मी वहिनींना मी पाहतोय. आपल्या माणसांवर अन्याय होत असताना, आरोप होत असताना, चिखलफेक होत असताना त्या जराही डगमगत नाही. त्यांचा तोल ढळत नाही, त्या विचलित होत नाहीत. त्या चंद्राप्रमाणे शांत आहेत. त्या समोर बसलेल्या असताना मला त्यांच्या रुपाने माँ साहेबांचा भास होतोय, असे भास्कर जाधव म्हणाले. आपल्या माणसांवर वार झालाय, त्यांच्याशी गद्दारी झालीये. आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढलंय, आता घरात बसायचं नाही, आता बाहेर पडू, असं आवाहनही त्यांनी केलं. भास्कर जाधव यांचं संबोधन ऐकून रश्मी ठाकरे काहीशा भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना ठाकरे गटाची सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर संपन्न होत आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक पण तितकंच भावुक भाषण केलं. अनेकवेळा शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांचं जाहीर सभांमधून कौतुक करताना दिसतात. पण भास्कर जाधव यांनी आपलं भाषण उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर केलं.

रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनेच्या सभांवेळी व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रुपाने धगधगतं अग्रिकुंड असायचं. तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मी वहिनींना संयमी, शांतपणे बघितलं. उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळीही त्यांना जराही विचलित झालेलं मी पाहिलं नाही. आदित्य ठाकरेंवर नाना तऱ्हेचे आरोप झाले. त्यावेळीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. रश्मी ठाकरे म्हणजे माँसाहेबांचं रुप, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

रश्मी ठाकरेंना समोर बसलेले पाहिलं की माँसाहेब आठवतात, भास्कर जाधव भर सभेत तोंडभरुन बोलले

वहिनी आता बाहेर पडण्याची वेळ!

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “पूर्व विदर्भाची माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिलीये. तेथील महिला मला भेटल्या. त्यांनी मला सांगितलं, वहिनींना तुम्ही विनंती करा, वहिनी प्लीज तुम्ही बाहेर पडा. मी देखील हेच सांगतोय, आपल्या माणसांवर वार झालाय, त्यांच्याशी गद्दारी झालीये. आता वहिनी बाहेर पडण्याची वेळ आहे.”

रश्मी वहिनी यांचं रुप माँसाहेबांची आठवण करून देणारं

यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी कै. वेणूताई, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख, अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या विनम्र पत्नींच्या यादीत रश्मी ठाकरे यांचा समावेश आहे. एक आदर्श पत्नी, एक आदर्श माता म्हणून त्यांच्यावर एक लेख आला होता. खरोखर रश्मी वहिनी यांचं रुप माँसाहेबांची आठवण करून देणारं आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

तेजस ठाकरे म्हणजे वाघाचा बछडा

पुण्यात काँग्रेसच्या नेत्याने भाषण केलं होतं- आदित्य ठाकरे तुम्ही मला आवडता ते बाळासाहेबांचे नातू म्हणून नाही. माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र म्हणून नाही, मंत्री म्हणून नाही तर ज्यावेळी ४० कोल्ह्या कुत्र्यांनी तुमच्या कुटुंबाला घेरलं होतं, त्यावेळी तुम्ही वाघासारखी डकराळी फोडून त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहिलात. मला आज पत्रकार विचारतायेत- तेजस काल आरतीला बसले होते, ते राजकारणात प्रवेश करणार आहेत का? म्हटलो ते मला माहिती नाही. पण तेजस ठाकरेंना ज्यावेळी कधी वाटेल- त्यावेळी ते जरूर गरूड झेप घेतील कारण तो पण वाघाचा बछडा आहे.

देवभूमीतून निर्धार करू- गद्दारांना गाडू

देवभूमीतून निर्धार करू गद्दारांना गाडू, त्याच्याकरिता हे शिबिर निर्णायक ठरेल, असा आशावाद व्यक्त करून आपल्या आक्रमक पण तितक्याच भावुक भाषणाला भास्कर जाधव यांनी पूर्णविराम दिलं.

Source link

Bhaskar Jadhavbhaskar jadhav on rashmi thackerayrashmi thackerayshivsena nashik rallyuddhav thackeray wife rashmi thackerayनाशिक शिवसेना सभाभास्कर जाधवभास्कर जाधव रश्मी ठाकरेरश्मी ठाकरेशिवसेना नाशिक सभा
Comments (0)
Add Comment