शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना ठाकरे गटाचं शिबीर ऐतिहासिक नाशिकमध्ये संपन्न झालं. आज शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसैनिकांना केलेल्या मार्गदर्शनावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. शिवाय राम मंदिर उभं राहत असताना शिवसेनेचं अस्तिव नाकारणाऱ्या भाजप नेत्यांना अनेक सवाल विचारले.
तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा…
भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत. त्यांची उचलेगिरी सुरू आहे. हुडी-बिडी घालून भ्रष्टाचारी नेत्यांशी बोलणी केली. परंतु शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे. ज्यावेळी बाबरी मशीद कुणी पाडली, असा प्रश्न आला त्यावेळी भाजपचे नेते एकमेकांकडे बोट दाखवून पळ काढत होते. परंतु त्यावेळी बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली. भाजपाचे लोक म्हणजे दंगल झाली की पळणारी अवलाद. आमच्या नेत्यांवर, शिवसैनिकांच्या घरी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या धाडी पडतात. एकदा आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा… असं म्हणत ठाकरेंनी भाजप नेत्यांना ललकारलं.
बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी !
बीजेपीचं नाव भेकड जनता पार्टी ठेवलं पाहिजे. ही भेकडांची पार्टी आहे. भाकड तर आहातच पण भेकडही आहेत. केंद्रीय यंत्रणा घरगड्यासारख्या वापरतात. असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाहीत आणि होणारही नाहीत. विरोधी पक्षाला संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना वापरायचं, हे कुठलं हिंदुत्व आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
विश्वगुरू सत्तेत असताना जनआक्रोश मोर्चे काढण्याची वेळ का आली?
भाजपवाल्यांनी महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले होते. तिकडे तुमचे विश्वगुरु सत्तेत बसलेले असताना हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ का येते. जर जमत नसेल तर त्यांनी खुर्ची सोडून द्यावी, असा टोला ठाकरेंनी लगावला.