येत्या मार्चपासून ही सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’ने स्पष्ट केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे जाताना खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या वेळी संतापलेल्या राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील व्यवस्थापकाला सुनावले. त्यानंतर रांगा कमी झाल्या आणि वाहतूक सुरळीत झाली. त्या पार्श्वभूमीवर, रस्ते विकास महामंडळाने टोलनाक्यावर फास्टॅग करण्यासाठी प्रवाशांना जास्त वेळ थांबावे लागू नये; तसेच त्यासाठी रांगा लागता कामा नयेत, यासाठी खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
काउंटर्स दुप्पट होणार
‘सद्यस्थितीत तळेगाव टोलनाक्यावर प्रत्येकी आठ-आठ अशी सोळा काउंटर्स आहेत. त्याची क्षमता वाढवून आता प्रत्येकी १४-१४ अशी २८ पर्यंत करण्यात येणार आहे; तसेच खालापूर नाक्यावरही प्रत्येकी आठ-आठ अशी क्षमता आहे. त्या ठिकाणीही आता प्रत्येकी १७-१७ अशी ३४पर्यंत काउंटर्सची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या मार्चपर्यंत ही सुविधा कार्यान्वित करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे. त्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
तांत्रिक अडथळे दूर होणार
वाहने टोलप्लाझावर आल्यानंतर फास्टॅग स्कॅनिंग करताना वेळ लागतो. त्यात काही तांत्रिक अडथळे येत आहेत. त्यामुळे आता फास्टॅगचे स्कॅनिंग कमी वेळात होऊन टोल भरला जाईल आणि वाहन सोडले जाईल, अशी यंत्रणा करण्यात येणार असल्याचे ‘एमएसआरडीसी’तर्फे सांगण्यात येत आहे.
तळेगाव आणि खालापूर येथे टोलप्लाझांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल; तसेच नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे, असं रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.