IMD ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रांबाबत मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या देशात १९९ केंद्रे कार्यरत असून त्यांचा विस्तार करण्याऐवजी ही केंद्रे बंद करावीत, अशी सूचना भारतीय हवामान विभागातर्फे जारी करण्यात आली आहे. परिणामी पूर्वानुमान आणि मार्गदर्शनासाठी या केंद्रांवर अवलंबून असणारे लाखो शेतकरी चिंतेत पडले आहेत.

यंदाच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षानंतर जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कामकाज करता येणार नाही, असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे. सध्याची ही १९९ केंद्रे १ मार्च २०२३ पूर्वी बंद करावीत, अशा सूचना यात आहेत. महाराष्ट्रात सध्या ११ जिल्ह्यांमध्ये ही केंद्रे असून याचा फायदा हजारो शेतकरी घेत होते. भारतीय हवामान विभागाकडून येणाऱ्या जिल्हा पूर्वानुमानापलीकडे जाऊन शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात होते. या शेतकऱ्यांनी आता मार्गदर्शनासाठी नेमके कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात पालघर, नंदुरबार, सोलापूर, धाराशीव, संभाजी नगर, नागपूर, बुलडाणा, वाशिम, गडचिरोली, भंडारा आणि अमरावती येथे ही केंद्रे आहेत. काही केंद्रांच्या माध्यमातून ३० ते ४० हजार, तर काही केंद्रांच्या माध्यमातून दोन ते तीन लाख शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जात होती, असा अंदाज नंदुरबार येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी वर्तवला. भारतीय हवामान विभागाने ही केंद्रे बंद होण्यासंदर्भात दिलेल्या नोटिशीबद्दल शेतकऱ्यांना सांगण्यात आले असून, या शेतकऱ्यांनी आता यापुढे माहिती कशी मिळेल, असा प्रश्न विचारायला सुरुवात केल्याचे ते म्हणाले. मात्र या प्रश्नाचे उत्तर सध्या अधिकाऱ्यांजवळ नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे.

नोटीसमध्ये केंद्र केवळ बंद करण्याची नोटीस आली असून शेतकऱ्यांसाठी पर्याय कोणता, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या केंद्रांच्या माध्यमातून दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामानाचा अंदाज आणि त्यानुसार कृषिसल्ला दिला जात होता. २६ नोव्हेंबरला पडलेल्या पावसासंदर्भातही शेतकऱ्यांनाच नाही, तर सध्या मिरच्या सुकवणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांचे नुकसान टळले होते. हवामानाबद्दलचे लहान-मोठे प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी या केंद्रांपर्यंत थेट पोहोचत होते, असेही हे अधिकारी सांगत आहेत.

या पूर्वी राहुरी, दापोली, परभणी, इगतपुरी, अकोला, वर्धा, कोल्हापूर येथे कृषी हवामान केंद्रे प्रादेशिक स्तरावर स्थापित करण्यात आली होती. मात्र प्रादेशिक स्तरावरील या केंद्रांपर्यंत आजूबाजूच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी पोहोचत नाहीत. त्यामुळेच जिल्हा केंद्रे सुरू करण्यात आली होती आणि आता केवळ पाच वर्षांमध्ये ही केंद्रे बंद करण्याची सूचना दिली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

‘सुधारणेसाठी निर्णय’

जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुधारणेसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. मात्र ही केंद्रे बंद करताना त्याला सध्या दुसरा पर्याय काही नसून ही केंद्रे पुन्हा कधी सुरू होतील याबद्दलही आता काही माहिती देता येणार नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

central governmentdistrict agricultural weather stations closeimdWeather updateweather update farmerजिल्हा कृषी हवामान केंद्रशेतीसाठी हवामानाचा अंदाज
Comments (0)
Add Comment