निलेश हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ. आई वडील यांची इच्छा नसतानाही निलेशने सैन्य दलात भरती व्हायचे ठरवले होते. निलेशच्या आईने त्याला सैन्य दलात भरती नको होऊस, तिथे खूप हाल होतात, जेवण वेळेवर मिळत नाही, साधेसे काम कर, कुठे सैन्य दलात भरती होतोस, अशी विनवणी केली होती. परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर निलेश हा सैन्य दलात भरती झालाच.
निलेश हा अभ्यासात तसा मागे होता. कधी काळी अजिबात अभ्यास न करणारा निलेश आज सैन्य दलाची परीक्षा पास होऊन भरती झाला. निलेशशी संपर्क केला असता त्याने संगितले की, मला अभ्यास करायचा कंटाळा येत होता. मी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मी भडगाव येथे बीएला प्रवेश घेतला, मी परीक्षा दिली आणि चार विषयात नापास झालो. बारावीनंतर नापास झाल्याने मी दोन वर्षांपूर्वी एक सलून व्यवसाय सुरू केला आणि आई वडिलांना हातभार लावू लागलो. दुकान सांभाळून मी रात्री दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. माझी मोठी बहीण मला म्हणायची तू शाळेत असताना कधी अभ्यास केला नाही आणि काय सैन्य दलात भरती होणार आहे.
मी बारावी पास झाल्यानंतर पुन्हा बाराखडी व पाढे आणि स्पेलिंग पाठ करायला लागलो. कारण मला काहीच येत नव्हते. भडगाव येथे तीन महिन्यासाठी क्लास लावले. त्यानंतर मी स्वतः घरीच अभ्यास करू लागलो. मला माझ्या मित्रांनी प्रोत्साहन दिले आणि मी भारतीय लष्करात भरती झालो, याचा सर्वात मोठा आनंद माझ्या आई वडिलांना झाला. ज्या दिवशी मी भरती झालो, सर्वात आधी आईला फोन करून सांगितले, तुझा मुलगा देश सेवेसाठी भरती झाला आहे. आईला त्याच क्षणी डोळ्यात पाणी आले. आमच्या भाऊबंदकीमध्ये मीच पहिल्यांदा सैन्यात भरती झालो.
मित्रांनी जल्लोष केला
आपला मित्र सैन्य दलामध्ये भरती झाल्याचा आनंद मित्रांना गगनात मावेनासा झाला होता. निलेश गावात दाखल होताच त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलून डीजेच्या तालावर मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News