सदावर्ते आणि सरकारही म्हटलं, जरांगेंना मुंबईत एन्ट्री नको पण हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये, अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनीही मुंबईत प्रचंड प्रमाणात गर्दी आल्यास शहर ठप्प होईल, अशी भीती व्यक्त करत मुंबईबाहेर आंदोलन होणे योग्य ठरेल, असे म्हणणे कोर्टात मांडले. यादरम्यान महाधिवक्ता सराफ यांनी आंदोलनाविषयीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विविध दाखले दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणतीही आडकाठी न घातल्याने मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरिता गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.

न्यायालयात काय झालं?

जरांगे यांचे आंदोलन बाबत सरकारकडे कोणतेही निवेदन आलेले नाही.. त्यामुळे ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी येत आहे, त्याबद्दल सरकारलाही चिंता आहे. शांततेने आंदोलन करण्यास सरकारचा विरोध नाही, तो नागरिकांचा हक्क आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी शहरात येऊन पूर्ण शहर ठप्प होणार असेल तर ते चुकीचे ठरेल. सुप्रीम कोर्टानेही आंदोलनांच्या बाबतीत हे निवड्यांत स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मुंबई शहरात येऊ देण्याऐवजी त्यांना मुंबईबाहेर एखाद्या मैदानात जागा देणे योग्य ठरेल, असं मत महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मांडलं.

त्यावर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. तुम्ही काय करत आहात? असा सवाल खंडपीठाने सरकारला विचारला. त्यावर राज्य सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि त्याप्रमाणे पावले उचलत आहे, असं उत्तर महाधिवक्ता यांनी दिलं.

कायदा सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे, हे खरे आहे पण या प्रकरणात सरकार विभागले गेले आहे. जरांगे यांनी यापूर्वी आंदोलन करताना व्यासपीठावरूनच सरकारला इशारा दिला की आंदोलनकर्त्याच्या विरोधातील नोटिसा मागे घ्यावा लागतील.. अशा स्थितीत पोलिस काय करणार? उद्या ते मुंबईत आले तर रुग्णालय, शाळा, इत्यादींवर प्रभाव पडणार आहे.
त्यामुळे हायकोर्टाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, अशी बाजू सदावर्ते यांनी मांडली.

त्यावर तुम्ही म्हणताय की सरकारला काही अर्ज आलेला नाही. मग हे ३१ डिसेंबर रोजी आझाद मैदान पोलिस ठाण्यात आलेले काय आहे? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. त्यावर ते फक्त माहितीच्या स्वरूपात आले. अर्ज असा करण्यात आलेला नाही आणि परवानगी मागितलेली नाही, अशी माहिती महाधिवक्ता यांनी दिली.

आझाद मैदानाची क्षमता केवळ पाच हजार आहे आणि शिवाजीपार्कमध्ये हायकोर्टच्या जुन्या आदेशांप्रमाप्रमाणे विशिष्ट अपवाद वगळता राजकीय सभा घेण्यास आडकाठी आहे, असेही म्हणणे महाधिवक्ता सराफ यांनी मांडले.. आंदोलनांदरम्यान रस्ते अडवता येणार नाहीत आणि नागरिकांची गैरसोय होईल या पद्धतीने रहदारीला अडथळा निर्माण करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने अमित साहनी निवड्यात म्हटलेले आहे, असेही सराफ यांनी निदर्शनास आणले.

तसेच त्या निवड्यातील दिशा निर्देशांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व खबरदारी घेईल, संपूर्ण पोलिस बळ त्याकामी लागले आहे, असेही सराफ यांनी हायकोर्टात सांगितले. त्याप्रमाणे सरकारची ग्वाही अंतरिम आदेशात नोंदवून खंडपीठाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. तसेच यादरम्यान आवश्यक असल्यास अर्ज करून पुन्हा कोर्टाला हस्तक्षेप करण्याची विनंती करता येईल, अशी मुभाही खंडपीठाने सदावर्ते यांना दिली.

Source link

Bombay high courtbombay high court newsmanoj jarange patilmanoj jarange patil agitation in mumbaimanoj jarange patil azad maidanmanoj jarange patil newsMumbai High Courtमनोज जरांगे आंदोलन परवानगीमनोज जरांगे पाटीलमनोज जरांगे मुंबई आंदोलन परवानगी
Comments (0)
Add Comment