राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस वाद चव्हाट्यावर; स्थानिक नेत्याला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा?

हायलाइट्स:

  • दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर
  • काँग्रेस नेत्याला वरिष्ठांचाही पाठिंबा
  • राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची भूमिका अद्याप अस्पष्ट

अहमदनगर : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी नगर शहरात मात्र दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. यामध्ये काळे यांना पक्षाच्या वरिष्ठांचाही पाठिंबा असल्याचं आता पुढे आलं आहे. काळे यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवत ती पक्षाची भूमिका नसल्याचे सांगणाऱ्या एका कार्यकर्त्याला काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून २४ तासांच्या आतच शिस्तभंगाची नोटीस आली आहे.

आमदार जगताप आणि काळे यांच्यात अलीकडेच नगरच्या आयटी पार्कच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. यामध्ये काळे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांमधून आपली भूमिका जाहीर केली. आयटी पार्क प्रकरण काळे व्यक्तीद्वेषाने हाताळत असून काळे यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं होतं. भुजबळ यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने भुजबळ यांना तातडीने नोटीस पाठवण्यात आली आहे.

यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पटोले आणि प्रदेश काँग्रेसही काळे यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट होतं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून यापूर्वी आणि आताही या वादाबद्दल काहीही भूमिका घेण्यात आलेली नाही.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा.ई. नगराळे यांनी भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वेळोवेळी जी आंदोलने आणि कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्या विरोधी भूमिका घेऊन आणि परस्पर माध्यमांत त्यास प्रसिद्धी देऊन आपण वारंवार पक्षशिस्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आलं आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून आपणास कळवण्यात येते की आपली ही कृती गंभीर असून आपणास या बाबतीत काँग्रेस पक्षातून निलंबित का करू नये, याचा खुलासा पुढील सात दिवसांच्या आत करावा. अन्यथा याबाबत आपणास काहीही म्हणायचे नाही, असं गृहीत धरून आपणाविरुद्ध पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, आयटी पार्कच्या संदर्भात शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांची मते आजमावून पक्षश्रेष्ठींसमोर ती मांडणार असल्याचं भुजबळ यांनी जाहीर केलं होतं. मात्र ही बैठक घेण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने कारवाईचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे काळे यांना पाठिंबा देणारे फलक शहरात विशेषत: एमआयडीसी भागात लावण्यात आले आहेत.

Source link

ahmednagar newscongress ncpअहमदनगरकाँग्रेसकाँग्रेस राष्ट्रवादीराष्ट्रवादी
Comments (0)
Add Comment