हायलाइट्स:
- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर
- राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडले
- आगामी २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा (Kolhapur Rain Updates) जोर कायम आहे. धरणक्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडले. पंचगंगेसह बहुसंख्य सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेली आहेत. हवामान विभागाकडून आगामी २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. सोमवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी शहरात काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली. मात्र, धरण क्षेत्रात त्याचा जोर होता. जोरदार सरी कोसळल्याने या भागात धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे दुपारी उघडण्यात आले आहेत. त्यातून चार हजारांहून अधिक क्युसेसचा विसर्ग सुरू झाला.
धरणाचे दरवाजे उघडल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पंचगंगा नदी २१ फुटावरून वाहू लागली आहे. राजाराम बंधारा या हंगामात पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे. याशिवाय सात बंधारे पाण्याखाली गेल्याने काही मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. २४ तासात जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राधानगरी, गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यातील जनतेला सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जुलैमध्ये झालेल्या पूरस्थितीनंतर जिल्ह्यातील नागरिक अद्यापही सावरलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.