पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रात मारणे, मोहोळ या टोळ्यांचा प्रचंड दबदबा राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद मोहोळ याची कोथरुडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळ यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने या हत्येचे राजकीय पडसादही उमटले होते. त्यानंतर गजा मारणे यांनी पार्थ पवार यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. गजा मारणे याच्यावर खंडणी, मोक्कासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पार्थ पवार आणि गजा मारणे यांची भेट वादाचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट);शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्ता धनकवडे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते. गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून, त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणेची पत्नी जयश्री मारणे या माजी नगरसेविका आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मारणे दाम्पत्याने पार्थ पवारांची भेट घेतल्याने या भेटीची चर्चा आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.