‘…तोपर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही?’

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनारुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांनादेखील सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील महत्त्वाची बैठक नुकतीच झाली असून या दोन्ही यंत्रणांमधील समन्वयक समितीने खासगी रुग्णालायंमधील करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.

‘करोनास प्रतिबंध करण्यासाठी खासगी रुग्णालयांमधील पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला आहे. औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा योग्यप्रकारे व्हावा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असून सध्या औषधे, ऑक्सिजनचा किती साठा आहे याचीही माहिती घेण्यात आली आहे. रुग्णसंख्येमध्ये ज्या प्रमाणात वाढ होईल त्यादृष्टीने औषधांची तसेच इतर बाबींची उपलब्धता ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती या समितीचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

वाचा: पालक मुलांसोबत कोविड केंद्रात राहू शकणार; BMC चा मोठा दिलासा

तिसरी लाटेच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू असली तरीही अद्याप ही लाट आली आहे यावर पालिका प्रशासनाने शिक्कामोर्तब केलेले नाही. वैद्यकीय तज्ज्ञांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अद्याप तिसरी लाट आल्याचा दावा करता येत नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. पन्नास हजार चाचण्या केल्यानंतर पाचशे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांचे चाचण्यांतील प्रमाण एक टक्का असताना तिसरी लाट येण्याबद्दल निश्चित निदान करता येणार नाही. १६ ऑगस्टनंतर निर्बंध खुले झाले. सर्वसामान्यांना लोकलमुभा दिल्यानंतर रोज एक हजाराने रुग्णसंख्या वाढेल, अशी शक्यता पालिका प्रशासनाला वाटत होती. मात्र प्रत्यक्षात रुग्णसंख्या तितक्या गतीने वाढलेली नाही. मुंबईतील ५५ लघु, मध्यम तसेच मोठ्या खासगी रुग्णालयांना मुलांसाठी प्राधान्याने वैद्यकीय उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णालयाने लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांची समिती नेमावी असेही सूचित करण्यात आले आहे.

…तोपर्यंत तिसरी लाट नाही!

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसत असली तरीही ही वाढ अपेक्षितच होती असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मुंबईमध्ये वाढली आहे. बाजारपेठांमध्येही गर्दी होत आहे. अनेकजण प्रवास करून गावी जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र विषाणूमध्ये मोठे परिवर्तन होत नाही तोपर्यंत तिसरी लाट येणार नाही, असे सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यासक डॉ. माधव साठे यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या लशींच्या मात्रा या डेल्टा आणि डेल्टा प्लसवर परिणामकारक आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर सुरू ठेवला तर संसर्ग नियंत्रणात राहील, असेही ते म्हणाले.

Source link

BMC To Private HospitalCorona Cases in Mumbaimumbai corona casesकरोना रुग्णवाढबीएमसी
Comments (0)
Add Comment