पोलिसांनी परवानगी नाकारताना काय म्हटलंय?
ज्याअर्थी, आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक व वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणारा प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे.
त्याचप्रमाणे आपण वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे सदरचे आंदोलन हे अनिश्चित कालीन असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरविणे शक्य होणार नाही व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.
ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावर पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान ३०२४/प्र.क्र. १२/२०२४/कीयुसे-१, दि. २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवान देण्यात आलेली नाही.