राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार दोन गटांत विभागले गेले. मात्र अतुल बेनके यांनी फुटीनंतर लगोलग भूमिका जाहीर न करता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभेआधी राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. गुरू शरद पवार यांचा शब्द प्रमाण मानून पुढे जायचं की बदलत्या राजकीय समीकरणांना समोर ठेवून अजितदादांना साथ द्यायची? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर आज अजित पवार यांच्या जुन्नर दौऱ्यावेळी शेतकरी मेळाव्यात त्यांनी जाहीररित्या दादांसोबत जाण्याचा निर्णय जनतेला सांगून टाकला.
बेनके कुटुंब गेल्या चाळीस वर्षांपासून पवार कुटुंबाशी एकनिष्ठ
वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी बेनके कुटुंबाचा मोठा वाटा आहे. जुन्नर तालुका म्हटलं की पहिल्यांदा बेनके कुटुंब हेच डोळ्यासमोर येते. वल्लभ बेनके यांना अनेक पदांवर काम करण्याची संधी शरद पवार यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील पाणी योजना आणण्यात मोठा बेनके यांचा मोठा वाटा आहे. वल्लभ बेनके यांच्यानंतर अतुल बेनके यांना आमदार बनवून एका युवा नेतृत्वाला संधी देण्याचं कामही शरद पवार यांनी केलं. मात्र आता शरद पवारांशी एकनिष्ठ असणारा हा शिलेदार अजित पवारांनी फोडला असून अतुल बेनके आता दादांच्या नेतृत्वात काम करणार आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांना धक्का
शिरूर लोकसभेचा खासदार म्हणून निवडून येण्यात तथा अमोल कोल्हे यांच्या विजयात बेनके कुटुंबियांचा मोठा वाटा राहिला. मात्र अतुल बेनके हेच आता अजित पवार गटात गेल्याने अमोल कोल्हे यांना मोठा धक्का बसला असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा कस लागणार, अशी शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत.