शंकर बाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले. वझर येथील त्यांचे अंबादास पंत वैद्य अपंग मुलांचे आश्रम आहे. शंकर बाबा पापळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्या अभिनंदन केले जात आहे
राज्यभरातील रस्त्यांवर, रेल्वे, एसटीच्या स्थानकावर, संडासच्या टाक्यांमध्ये टाकलेल्या आणि जन्मापासूनच अंधारयात्रेत भरकटलेल्या अंध, अपंग, मतिमंद १२३ बालकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांचं नंदनवन साकारलेल्या मुलामुलींच्या हातून चक्क एक वृक्षलतांचं जंगलच निर्माण करणारा अवलिया शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
अमरावती जिल्हा ओळखला जातो तो तीन ‘ख’साठी ‘खंजिरी’ भजनातून प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हातात ‘खडू’ घेऊन सर्वसामान्य गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी आयुष्य वेचणारे डॉ. पंजाबराव देशमुख आणि ‘खराटा’ घेऊन स्वच्छता करणारे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या कर्तुत्वाने. याच महापुरुषांच्या प्रेरणेतून पत्रकारिता करणारा शंकर जेव्हा अनाथ मूकबधीर बेवारस यांच्या वेदना बघतो आणि यांच्या संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतो. पुढे हाच तरुण वझ्झर मॉडेल विकसित करून अख्ख्या भारतासमोर एक आदर्श निर्माण केला. सोबतच पंधरा हजार झाडांचं ‘अनाथारण्य’ अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी फुलवतो ते सुद्धा कुठली शासकीय मदत किंवा अनुदान न घेता.
सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर या अनाथांच्या नाथाने वझ्झर येथे राज्यभरातील बेवारस दिव्यांगांना आश्रय दिला आहे. या आश्रमात ९८ मुली आणि २५ मुले असे एकूण १२३ मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित वास्तव्य करत आहेत. अनाथांचे नाथ अशी ओळख असलेले शंकरबाबा पापळकर यांनी आतापर्यंत अनेक मोठे पुरस्कार घेण्यास नकार दर्शविला आहे.
परतवाडा सोडल्यानंतर याच सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वझ्झर नावाचं एक इवलंसं गाव आहे. गेल्या जवळपास दोन तपापासून ते अख्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्धीस आलं आहे. १९९० साली सुरु झालेल्या या नंदनवनाचं नाव आहे स्व.अंबासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचा आश्रम. तब्बल १२५ अंध, अपंग, मतिमंद, मूकबधीर इ. बालकं इथं आहेत, यातील काही मुलं अशी आहेत की, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याघी आहेत तर काही कायमचे अंधारयात्री आहेत. या अनाथ मुलांना मायेची ऊब देणारा एक अवलिया अशी शंकरबाबा पापळकर यांची ओळख आहे.
या मुलांची ते गेल्या दोन तपापासून अहोरात्र सेवा करतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एवढेच नव्हेतर वयाची २१ वर्षे झालेल्या या अंध, मुकबधीर तरुण मुलामुलींना नोकरी देऊन त्यांचे संसारही या ‘बाप’ माणसाने स्वबळावर उभे केले आहे. अशाच काही कुटूंबात सुदृढ बालकंसुद्धा जन्माला आली आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी शंकररावांच्या समाजसेवेतून फुललेल्या या नंदनवनाचा सुगंध दूरवर भारतभर दरवळला आहे. तेही जाती-धर्माला पुसटसाही स्पर्श न करतात ते हा वसा चालवतात.
Read Latest Maharashtra News And Marathi News