सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे तब्बल आठशे ते हजाराची घसरण झाली आहे. मंगळवारी १६०० रुपये भाव मिळालेल्या कांद्याला गुरुवारी ९५० रुपयांचा भाव मिळाला. सर्वच प्रकारच्या कांद्याच्या दरात मंगळवारच्या तुलनेत निम्म्या फरकाने कमी भाव मिळाला. यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर निर्यातबंदी हटावच्या जोरदार घोषणा देऊन मोदी सरकारचा निषेध नोंदविला. या वेळी बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे, सचिव दत्तात्रय सूर्यवंशी आणि जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
‘आमच्या पिकाला हमीभाव द्या, कांद्यावरील जुलमी निर्यातबंदी हटवा; अन्यथा गांजा लागवडीला तरी परवानगी द्या,’ अशी संतप्त मागणी या वेळी कांदा उत्पादकांनी दिली.
एक दिवसाआड नियोजनाचा फटका
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी एक दिवसाआड कांदा लिलावाचा पर्याय काढून तसे नियोजन केले; परंतु बाजार समितीचे हे नियोजन शेतकऱ्यांना आत्महत्येकडे घेऊन जाणारे ठरत आहे. एक दिवस लिलाव बंद राहत असल्याने दुसऱ्या दिवशी आवक वाढत आहे. नेमका याचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यात व्यापारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला आहे.
जिकडे-तिकडे कांदाच कांदा
सोलापूर बाजार समितीत जिकडे पाहील, तिकडे कांदाच दिसत होता. कांदा सेल हॉल व परिसर, फुल बाजार, गूळ मार्केट, भुसार बाजार याठिकाणी सर्वत्र कांद्याची पोतीच दिसत होती. बुधवारी रात्रीपासून वाहतुकीची झालेली कोंडी गुरूवारी सकाळपर्यंत होती. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर, बीड कर्नाटकातील कलबुरगी, बिदर, विजयपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. हा कांदा उतरविण्यासाठी हमालही मिळत नव्हते. याचा शेतकर्यांना फटका बसला असून बाजार समिती प्रशासनाचे नियोजन पुरते कोलमडले होते.
इतिहासातील सर्वाधिक आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५० वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक आवक गुरुवारी झाली. १४४८ ट्रकमधून सुमारे एक लाख ४४ हजार ८०१ क्विंटल कांद्याची आवक झाल्याची नोंद झाली आहे. किमान १०० तर कमाल १७७५ रुपये; तर सरासरी ७०० रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. यातून दहा कोटी तेरा लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.