हायलाइट्स:
- लष्करात भरती होण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणारी टोळी गजाआड.
- अहमदनगरमधील पाथर्डी येथे ही टोळी कार्यरत होती.
- नाशिकच्या देवळाली कँप येथील लष्करी गुप्तर विभाग आणि अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई.
अहमदनगर:लष्करात भरती होण्यासाठी तसेच सरकारी नोकरीसाठी शाळा सोडल्याच्या दाखल्यासह अन्य बनावट कागदपत्रे तयार करून देणारी टोळी पाथर्डीत पकडण्यात आली. नाशिकच्या देवळाली कँप येथील लष्करी गुप्तर विभाग व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बनावट ग्राहक पाठवून दोघांना जागीच पकडण्यात आले असून नगर व नाशिकमधील एकूण सहा जाणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेल्या शाळांच्या नावे असे दाखले मिळवून काही जणांनी लष्करासह अन्य सरकारी विभागांत नोकऱ्या मिळविल्याचे उघड होत आहे. (Police nab gang for giving fake credentials to join army)
देवळाली कँप येथील लष्करी गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली होती. त्यांनी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी विनायक मासळकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मारुती आनंदराव शिरसाठ (रा. जांभळी, ता.पाथर्डी) व दत्तू नवनाथ गर्जे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर कुंडलिक दगडू जायभाय (रा. अनपटवाडी, ता. पाटोदा), मच्छिंद्र कदम (रा. मानूर कासार), अजय उर्फ जय टिळे (रा. वाडीवरे, ता. इगतपुरी) व शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद जि. नाशिक) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा- राणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?; नितेश राणे, नीलम राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलर
अशी झाली कारवाई
बनावट ग्राहक पाठवून पोलिसांना सापळा रचून बुधवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली. बनावट ग्राहक म्हणून अभी माधव सहाणे (वय २०, रा. साकुर, ता. इगतपुरी, नाशिक) याला २ हजार रुपये देऊन पाठविण्यात आले. यावेळी आरोपींनी पाथर्डी शहरातील नाथनगर येथील शनि चौकाजवळच्या दुमजली इमारतीमध्ये नेऊन बनावट दाखला दिला. सहाणे यांनी ठरलेला इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने धाव घेत दोघा आरोपींना पकडले. त्यांची तसेच तेथील कार्यालयाची झ़डती घेण्यात आली. तेथून विविध संस्थेचे शिक्के, बनावट दाखले यांच्यासह विविध कागदपत्रे व साहित्य जप्त करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- ‘सत्य पराजित नहीं होता’; महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मंत्री छगन भुजबळ दोषमुक्त
आरोपींनी एकत्र येऊन संगतमताने सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज तयार केले. तो खरा आहे असे भासवून त्याचा शासकीय कामासाठी गैरवापर केला. सैन्य दलातमध्ये नोकरी मिळून सरकारची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- भुजबळ दोषमुक्त; दमानिया कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात जाणार