मेट्रो ट्रॅकखालून रस्ता
खराडी-शिवणे रस्ता महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला, तरी गेली अनेक वर्षे भूसंपादनाअभावी हा रस्ता रखडला आहे. या रस्त्याचा पूर्वेकडचा महत्त्वाचा भाग असलेला खराडी ते गुंजन चौक या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. गुंजन टॉकीज जोडण्यासाठी भूसंपादन रखडल्याने तयार रस्ता वापरता येत नसल्याची परिस्थिती आहे. महामेट्रोने या ठिकाणी खांब उभारून मेट्रो ट्रॅक तयार केला. हा ट्रॅक खराडी-शिवणे रस्त्यावरूनच जातो. त्यामुळे नगर रस्त्यावरून या रस्त्याला जोडण्यासाठी ट्रॅकखालून रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याला महामेट्रोची परवानगी आल्यानंतर या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
१२ कोटी रुपये खर्च
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी शहरातील अर्धवट राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेतला आहे. वाहतूक अभियंता निखिल मिजार यांनी शहरातील सर्व अर्धवट राहिलेल्या रस्त्यांची माहिती संकलित केली असून, त्यात गुंजन टॉकीज ते खराडी-शिवणे रस्त्याचे रखडलेले काम हा एक महत्त्वाचा रस्ता नमूद करण्यात आला होता. अवघ्या काही फूट रस्त्यासाठी भूसंपादन होत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेला रस्ता वापरात नव्हता. महामेट्रोचे खांब उभे राहिल्यानंतर त्याखालून रस्ता तयार करणे शक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर ही ‘मिसिंग लिंक’ जोडण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. महापालिकेने या रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार केले असून, त्यासाठी १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
खराडी-शिवणे रस्त्याची परिस्थिती
पुणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी शिवणे-खराडी रस्त्याचे काम २०११मध्ये सुरू होऊनही अद्याप पूर्ण झालेले नाही. रस्त्यासाठी भूसंपादनाच्या मुद्द्यासह अनेक ठिकाणी न्यायालयीन वाद सुरू असल्याने हा महत्त्वाचा रस्ता रखडला आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात शिवणे ते खराडी हा नदीकाठचा रस्ता आरक्षित आहे. शिवणे ते म्हात्रे पूल (सहा किलोमीटर), म्हात्रे पूल ते संगमवाडी (पाच किमी) आणि संगमवाडी ते खराडी (११.५० किमी) असे कामाचे तीन टप्पे केले आहेत. त्यातील म्हात्रे पूल ते संगमवाडी हा टप्पा विकसित करण्यात आलेला नाही. उर्वरित दोन टप्प्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहेत. या कामास सातत्याने मुदतवाढ दिली असून, त्यावर काहीशे कोटी रुपये खर्चही झाले आहेत. भूसंपादनाअभावी हा रस्ता रखडला आहे.
महापालिकेने गुंजन टॉकीज ते खराडी या रस्त्याला जोडण्यासाठी आवश्यक ती ‘मिसिंग लिंक’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर नगर रस्त्यावरून कल्याणीनगर परिसरात जाण्यासाठी एक महत्त्वाचा पर्यायी रस्ता तयार होणार असून, त्याद्वारे नगर रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत मिळेल.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका