हायलाइट्स:
- छगन भुजबळांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
- भाजपला दिला जोरदार इशारा
- ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याचाही आरोप
कोल्हापूर : ‘राज्यात अनेक नेत्यांवर भाजप जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहे, अनेकांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावत आहे, त्यांचा हा उद्योग सुरू असला तरी कधी ना कधी त्यांना फेडावे लागेल,’ असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाने क्लीनचिट दिली. आम्ही अनेक वर्षे हेच सांगत होतो की, ते या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांना अडकवलं जात आहे. भुजबळ यांच्याप्रमाणे अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पैशाचा कोणताही व्यवहार झाला नाही. केवळ तिसऱ्याने चौथ्याला काही तरी सांगितलं म्हणून त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावला आहे. दहा वीस वर्षापूर्वीचे रेकॉर्ड तपासत पत्नी आणि मुलाला त्रास दिला जात आहे. भाजप जाणीवपूर्वक हे सारे करत आहे. कधी ना कधी त्यांना हे फेडावे लागणार आहे.
‘भुजबळ मात्र अपवाद ठरले’
‘छगन भुजबळ निर्दोष सुटतील याचा आम्हाला आणि त्यांनाही विश्वास होता. मोठ्या धीराने त्यांनी संकटाशी सामना केला. तुरूंगवास भोगला. तुरूंगवासाच्या भीतीने अनेकांनी भाजपचा रस्ता धरला. भुजबळ मात्र याला अपवाद ठरले. न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं, याचं समाधान वाटत आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी यापुढे तरी धडा घ्यावा,’ असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.