डॉ नागेश सेनिगारापू विरार पश्चिम येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटेच राहत होते. सोमवारी ते फोन कॉल्सना कुठलाच प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा भाऊ फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा त्याला बेडरूममध्ये दोन्ही हाताची मनगटं कापलेल्या अवस्थेत ते आढळले. अर्नाळा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. एपीआय रणजितसिंह परदेशी यांनी सांगितले की, कुटुंबालाही तेव्हा कुठलाही संशयास्पद प्रकार वाटला नाही.
प्राथमिक शवविच्छेदन अहवालात आत्महत्या वाटत असली, तरी सेनिगारापू यांचा फोन गायब असल्याने पोलिसांना संशय आला. “त्यांच्या एका मनगटावर खोल वार झाला होता आणि दुसऱ्यावरची जखम तितकी खोल नसल्यामुळे ती आत्महत्या भासत होती” असे परदेशी म्हणाले. पोलिसांनी सेनिगारपूचा कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) मिळवला आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
फुटेजमध्ये २१ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एक व्यक्ती इमारतीत शिरताना दिसला. काही तासांनंतर तो निघून गेला. इमारतीतील रहिवाशांना त्याची ओळख पटू शकली नाही किंवा सेनिगारापूचे कुटुंबही ओळखू शकले नाहीत. सीडीआरमध्ये असे दिसून आले आहे की सेनिगारापू हे अल्फरन खान नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होते. पोलिसांनी सापळा रचून त्याला मंगळवारी ओशिवरा येथून ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली.
त्याने पोलिसांना सांगितले की तो चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधात होता. त्याने मसाज थेरपिस्ट म्हणूनही नोकरी केली होती. एक वर्षापूर्वी तो सेनिगारापू यांना भेटला आणि त्यांची मैत्री झाली. त्याने अनेक वेळा सेनिगारापू यांना भेटल्याचे पोलिसांना सांगितले.
रविवारी सेनिगारापूंनी त्याला पहिल्यांदा घरी बोलावले. त्याने पोलिसांना सांगितले की त्याने सेनिगारापूंकडे काही पैशांची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने स्वयंपाकघरातील चाकू वापरून सेनिगारापूंचे मनगट कापले आणि त्यांचा फोन घेऊन पळ काढला.
सेनिगारापू यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की सेनिगारापू यांची १८ जानेवारी रोजी झालेली पदोन्नती हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा मोठा क्षण होता. “ते अत्यंत आनंदी होते. प्रमोशन वेळेवर व्हावे, यासाठी त्यांनी खूप पेपरवर्क केले होते,” असे एका सहकाऱ्याने सांगितले. सेनिगारापू २० जानेवारी रोजी महाविद्यालयात अखेरचे गेले. ते महाविद्यालयातील वाणिज्य संशोधन केंद्राचे प्रमुख होते. तिथे त्यांनी १३ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले होते आणि पीएचडी विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक होते.
Read Latest National News Updates And Marathi News