लाखो रुपयांना गंडवलं
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, केशाराम पिता सवाराम (रा. सांचोर, राजस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. गुजरात) आणि रमेशकुमार दरगाराम (रा. जालोर, राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना तवली फाटा परिसरातून ताब्यात घेतले. एका नामांकित मिठाई व्यावसायिकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सातपूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, संशयितांची माहिती काढण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी सापळा रचण्याची सूचना केली. त्यानुसार अंमलदार संदीप भांड, महेश साळुंके, मिलिंद परदेशी, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
– तवली फाटा परिसरात संशयितांच्या झोपड्या
– सन १९०० मधील चांदीची नाणी
– खऱ्या सोन्याचे दोन मणी
– ढिगभर सोन्याची नाणी, माळा बनावट
– ‘हेरिटेज कॉइन’चाही वापर
– मोबाइल, दुचाकी जप्त
– १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल
– सातपूर एमआयडीसी, हिरावाडी, उपनगरमध्ये फसवणूक
– सातपूर, पंचवटीमध्ये गुन्हे नोंद
फिर्यादीची सतर्कता
फिर्यादी हे नाशिक शहरातील नामांकित मिठाई व्यावसायिक आहेत. सातपूर एमआयडीसीत त्यांच्याकडे संशयित आले. त्यांनी खोदकाम करताना सोने मिळाल्याची माहिती देत विक्री करीत असल्याचे सांगितले. व्यावसायिकाला दोन सोन्याचे मणी देण्यात आले. हे मणी खरे असले, तरी व्यावसायिकाला संशय आला. त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांचा व फिर्यादीचा व्यवहार होऊ दिला. गुन्हा घडल्यानंतर सिनेस्टाइल पाठलाग करुन पथकाने संशयितांना अटक केली.
…असा होतो व्यवहार
दिवसभर प्लास्टिकची भांडी विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित फिरतात. व्यावसायिक किंवा विक्रेत्यांना हेरतात. त्यांच्याकडील ‘हेरिटेज नाणी’ दर्शवून खरेदीची गळ घालतात. दोन दिवसांनी पुन्हा तिथे येत ‘खोदकामात सोन्याची पोत सापडली आहे. बऱ्याच पोती आहेत’, असे सांगतात. वेळेप्रसंगी पोत तोडून दोन मणी समोरच्याला देतात. हातचलाखीने खऱ्या सोन्याचे मणी देतात. मात्र, दुसऱ्या दिवशी परत आल्यावर बनावट माळी, पोत, दागिने देत पैसे घेत पोबारा करतात.
मोबाइल, सीम नव्याने
एखादा ग्राहक गळाला लागल्यावर त्याच्याशी व्यवहार ‘फिक्स’ केला जातो. व्यवहार पूर्ण झाल्यावर संबंधित मोबाइल व सीमकार्डचा वापर थांबविण्यात येतो. पुन्हा नव्या ग्राहकाकरिता इतरत्र चोरी केलेले किंवा दुसऱ्याच्या नावे असलेले सीम व मोबाइल वापरतात. एकदा वापरलेले सीमकार्ड व मोबाइल संशयित पुन्हा वापरत नाहीत.
सातपूरच्या घटनेनंतर शहरातील इतर दोन घटना समोर आल्यात आहेत. त्याचेही गुन्हे नोंदविले आहेत. संशयितांनी अनेकांना फसविल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झालीय, त्यांनी गुन्हे-१ कार्यालयात संपर्क साधावा.- विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे-१