हायलाइट्स:
- पुण्याच्या ससून रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार
- नर्सच्या वेषात आलेल्या महिलेनं पळवलं तीन महिन्यांचं बाळ
- बंडगार्डन पोलिसांकडून गुन्हा दाखल, बाळाची सुटका
पुणे: नर्सच्या वेशात आलेल्या महिलेने पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून तीन महिन्यांच्या मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका महिलेला ताब्यात घेत मुलीची सुटका केली. (Three months baby abducted from Sassoon Hospital in Pune)
याबाबत २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला ही काही दिवसांपासून तिच्या तीन महिन्यांच्या मुलीवर उपचारासाठी ससून रुग्णालय येथे दाखल होती. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री नर्सच्या वेशभूषेत आलेली सव्वीस वर्षीय महिला आणि तिचा पती या दोघा आरोपींनी तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून संशयित महिलेला ताब्यात घेतला आहे. आरोपी पती-पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्यांचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवलेला ससूनची सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाचा: शिवसेना नेत्याच्या छळाला कंटाळून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या