अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संजय राऊत बोलत होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना राऊत म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कडकडून मिठी मारली. आता त्यांनीच सांगावे की, मराठा समाजाची फसवणूक झाली की नाही? कोणाचे ओरबाडून कोणाला आरक्षण दिले जाऊ नये. मात्र, ओबीसींवर अन्याय झाला आहे म्हणून मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावे,’ असेही राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधींची न्याय यात्रा का रोखता? जर तुमचा चारशे पारचा नारा असेल तर कशाला घाबरता? भाजपने आता घाबरू नये आमच्याशी मुकाबला करावा. देशात राहुल गांधीची आणि महाराष्ट्रात शिवसेनेची भीती भाजपला वाटते. राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ले केले तरीही ते पुढेच जात आहेत, असेही राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या शहराध्यक्षाने घेतली भेट..
शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खासदार संजय राऊत यांची घेतली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खा. राऊत यांना भगवी शाल घालत काळे यांनी त्यांचे ऐतिहासिक नगर शहरात काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी नगर शहरातील राजकीय गुंडगिरी, शैक्षणिक संस्थांच्या भूखंडांसह अन्य भूखंडावर होणारी ताबेमारी याबद्दलची कागदपत्रे, पुराव्यांसह फाईल देत सुमारे वीस मिनिटे चर्चा केली.
या बद्दलचे सविस्तर पत्र काळे यांनी यावेळी राऊत यांना दिले. विविध राजकीय मुद्द्यांवर देखील यावेळी बातचीत झाली. महाविकास आघाडी, आगामी लोकसभा निवडणूक यासह जिल्ह्यातल्या महायुतीचा सामना एकजुटीने करण्याबाबत यावेळी उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे काळे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहरातील राजकीय गुंडगिरी, ताबेमारीवर जोरदार हल्लाबोल केला. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.