काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव एप्रिल २०२० मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. मात्र, याच वर्षी १६ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ मध्ये संपणार होती. आता पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला जवळपास पाच वर्षे मिळणार आहेत. त्यामुळं आता राजीव सातव यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्र काँग्रसमधून अनेक दावेदार या जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यामुळं राजीव सातव यांच्याजागी त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात येत होती. मात्र, प्रज्ञा सातव यांच्याकडे नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकीकडे पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे देखील या जागेसाठी इच्छुक असून दिल्लीत त्यांनी हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे.
वाचाः …अन्यथा ठाकरे सरकार पडेल; अण्णा हजारेंनी दिला निर्वाणीचा इशारा
अविनाश पांडे, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांचीही नावं चर्चेत आहेत. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांना मागील दोन लोकसभा निवडणूकीत हार पत्करावी लागली आहे. त्यामुळं मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांना पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याची ही संधी असल्याचं बोललं जातंय. तसंच, पक्षाला देखील फायरब्रँड व अनुभवी नेता राज्यसभेसाठी पाठवायचा आहे. त्यामुळं या दोघांपैकी पक्ष कोणाची निवड करणार?; हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
मुकुल वासनिक हे प्रियंका गांधी याचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात व राज्यसभेसाठी प्रियंका गांधींची वासनिक यांच्या नावाला पसंती असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, एकीकडे अविनाश पांडे राज्यस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या माध्यमातून सोनिया गांधींच्या थेट संपर्कात आले आहेत. सोनिया गांधी सध्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी ओढवू इच्छित नसल्याचं चर्चा आहे. मिलिंद देवरा व संजय निरुपम हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. इच्छुक उमदेवारांपैकी सर्वांचेच पारडे जड आहे त्यामुळं राजीव सातव यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः … म्हणून आज मुंबईतील लसीकरण केंद्रे राहणार बंद
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी महाराष्ट्रासह पाच राज्यात रिक्त झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांना २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. २३ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल. २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. चार ऑक्टोबरला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर होईल.
वाचाः ‘७४ वर्षात जो देश उभा राहिला तो गेल्या ७ वर्षात विकला जातोय’