श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित एका शोभायात्रेच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजय गरुड व मंत्री गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांमधील चर्चा मात्र समजू शकली नव्हती. भाजपा प्रवेशा संदर्भात अद्याप संजय गरुड अथवा गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले नाही.
भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातून तीन वेळेस संजय गरुड यांनी अतिशय तगडे आव्हान उभे करत मंत्री गिरीश महाजन यांना लढत दिली होती. मंत्री महाजन यांचे विधानसभा मतदार संघातील तगडे प्रतिस्पर्धी व कट्टर विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.
संजय गरुड हे गेले पंधरा वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सरोजिनी गरुड या गेली दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्या म्हणून होत्या. तसेच गरूड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळले होते. त्याचप्रमाणे नियोजन मंडळावर सदस्य म्हणून त्यांनी कामकाज पाहिले होते. एकंदरीत बघता संजय गरुड यांची तालुक्यासह जिल्ह्यात कार्यकर्त्यांवर चांगली पकड आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर विरोध म्हणून गरुड यांची ओळख
जामनेर तालुक्यात राजकीय विरोधक गिरीश महाजन यांचे संजय गरुड आतापर्यंत कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तीन वेळा विधानसभेचे उमेदवारी करून जोरदार टक्कर दिली होती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय गरुड यांचा अवघ्या साडेतीन ते चार हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी जास्त वेळ त्यांच्या जामनेर मतदारसंघात दिला होता. त्यामुळे त्यांना बाहेरील मतदारसंघांमध्ये जास्त वेळ फिरता आले नाही. गरूड यांनी महाजनांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यात यश मिळवले.
या अनुषंगाने संजयदादा गरूड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून ते मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे ना. गिरीश महाजन यांनी बेरजेच्या राजकारणाचे एक मोठे उदाहरण यातून दाखवून दिले आहे. तर जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजयदादा गरूड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.