हायलाइट्स:
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुंबईत
- माझगावच्या अंजिरवाडी गणपतीचं सहकुटुंब घेतलं दर्शन
- काही लोकांच्या मनातील द्वेष दूर करण्याचं केलं आवाहन – छगन भुजबळ
मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मुंबईतील अंजिरवाडी इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. राज्यावरील करोना संकटाबरोबरच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोगही दूर कर,’ असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं. (Chhagan Bhujbal Took Blessings of Lord Ganesha in Mumbai)
माझगाव येथील अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं भुजबळ यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सहकुटुंब दर्शन घेतलं. भुजबळ यावेळी प्रसन्न दिसत होते. पत्रकारांशी बोलताना भुजबळ जुन्या आठवणीत रमले. माझगाव (Mazgaon) परिसरातील आठवणी त्यांनी सांगितल्या. शिवसेनेत प्रवेश, अंजिरवाडी मंदिराचं बाळासाहेबांच्या हस्ते झालेलं उद्घाटन या सर्व आठवणी त्यांनी जागवल्या. त्याच वेळी भुजबळा यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. गणरायाला काय साकडं घातलं हेही त्यांनी सांगितलं. ‘सर्वात आधी करोना दूर करा. करोना दूर झाल्यानंतर काही लोकांच्या मनातील रोग दूर करा. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सर्वांना निरोगी करा,’ अशी प्रार्थना गणरायाला केल्याचं ते म्हणाले.
वाचा: ‘आमचं चुकलंच, आम्ही कामं केली, पण झेंडे लावले नाहीत’
महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी न्यायालयानं काल दिलेल्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गणपतीही आशीर्वाद देतात आणि नियती आशीर्वाद देते ती जनतेच्या माध्यमातूनच देते. नियतीनं आशीर्वाद दिला. त्यामुळं मला न्याय मिळतोय. यापुढंही न्याय मिळेल. दोन प्रकरणात न्याय मिळाला. महाराष्ट्र सदन हे मूळ प्रकरण आहे. इतर खटले त्यावरच आधारलेले आहेत. इकडून तिकडून संबंध जोडून ही प्रकरणं तयार केली गेली आहेत. न्यायदेवतेलाही ते माहीत झालंय. त्यामुळं आम्हाला आनंद आहे,’ असं ते म्हणाले.
ईडीच्या गैरवापरावर बरसले!
केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) होत असलेल्या गैरवापरावरही त्यांनी टीका केली. ‘सीबीआय हा सरकारी पिंजऱ्यातील पोपट आहे, असं मागे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. आता ईडी हा दुसरा पोपट समोर आलाय. ईडीचा एवढा दुरुपयोग कधीही झाला नव्हता. पवार साहेबांनीही तेच सांगितलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून मी राजकारणात आहे. या काळात वेगवेगळी सरकारं आली. वाजपेयींचंही सरकार आलं. पण विरोधकांना अशी वागणूक कधीच दिली गेली नाही. जिथं जिथं विरोधी पक्षांचं सरकार आहे, विरोधक प्रबळ आहेत. तिथं त्रास देणं सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
वाचा: ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार; नर्सच्या वेषात महिला आली आणि…