७५व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त अस्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींसह विविध पदांवरील केंद्र व राज्य शासनाचे सनदी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
‘देशाच्या जीडीपीमध्ये योगदान देणारा महाराष्ट्र परकीय गुंतवणूक आणण्यात, उद्योग क्षेत्रात, स्टार्टअप उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. ही प्रगती महत्त्वाची असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा, नमो शेतकरी सन्मान निधीद्वारे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांसह एकूण १२ हजार रुपये देण्यासह, कृषी सौरवाहिनी योजनेद्वारे वीजपुरवठासह शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात येत आहे’, असे फडणवीस म्हणाले. नागपूर ग्रामीण पोलिसचे परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक दीपक अग्रवाल यांच्या नेतृत्वात पथसंचलन झाले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर व महेश बागदेव यांनी केले.
कर्तृत्वाचा सन्मान
प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा, यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्कार, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचे जिल्हास्तरीय विजेता, उत्कृष्ट पोलिस पथक, पोलिस आयुक्तालयाच्यावतीने देण्यात येणारी पोलिस पदके यांचाही समावेश आहे. निवडणूक सुधारणांसंदर्भातील उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचाही गौरव करण्यात आला.
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा
अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३चे वितरण करण्यात आले. यात नरखेड तालुक्यातील खेडी, गोवारगोंदी या ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. काटोल तालुक्यातील खुर्सापारला द्वितीय, डोली, भांडवलकर ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्कार
यशस्वी लघुउद्योग जिल्हा पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यात मे. शुभलक्ष्मी फुड इंडस्ट्रिज प्रो. अंकित अग्रवाल यांना प्रथम, मे. ब्रामनी इंडस्ट्रिज प्रो. हरीश पुरुषोत्तम शर्मा यांना द्वितीय तर मे. डॅफोडिल इन्गीव्हिन्स इंडिया प्रा. लि. यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज उपक्रम
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाचा जिल्हास्तरीय पुरस्कार क्रिष्णा कीर्तीकुमार सेदानी, प्रथमेश कारंजेकर, प्रणय छगन डोबळे, उदयसिंग ठाकूर, प्रथमेश नंदकिशोर कुईटे, सौम्या सुनील यादव, तान्या सत्तुजा, अवंती पुसदेकर, डॉ. कोमल रवींद्र देवतळे, प्रतीक मेश्राम यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचे भांडवल या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.
उत्कृष्ट पोलिस पथके व विद्यार्थी पुरस्कार
पथसंचलनात सहभागी पथकांपैकी तिघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. पोलिस पथकामध्ये पहिल्या क्रमांकाने नागपूर शहर महिला पोलिस, द्वितीय नागपूर शहर पोलिस तर तृतीय क्रमांकाने राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ यांना सन्मानित करण्यात आले. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक प्रहार डिफेन्स अॅकेडमी, खामला, द्वितीय क्रमांक वर्धमान सैनिकी शाळा वडधामना तर तृतीय क्रमांक प्रहार सैनिकी शाळा रविनगर यांच्या पथकांना देण्यात आला.