राज्य सरकारकडून २६ जानेवारी रोजी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम २०००बाबत ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेत सगेसोयरे यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, सगेसोयरे म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीत झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जाहीर करण्यात आले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
– ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे देण्यात येतील.
– ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणेगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसायरे.
– सगेसोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक, असा घेतला जाईल.
‘त्यांना’ही मिळणार प्रमाणपत्रे
कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधांतील सगेसोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. मात्र, या तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीतील आहे, यासंदर्भातील पुरावे देणे तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हेदेखील आवश्यक असल्याचे नमूद करतानाच त्याची पूर्तता करणाऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.