‘रोहित पवार हे त्यांच्या आजोबांचंही ऐकत नाहीत’

हायलाइट्स:

  • रोहित पवारांच्या पुढाकारानं भगवा स्वराज्य ध्वज यात्रेला सुरुवात
  • माजी मंत्री राम शिंदे यांचा पवारांना खोचक टोला
  • आम्ही कामं केली, पण झेंडे लावले नाही ही चूक झाली – राम शिंदे

अहमदनगर: कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून खर्डा येथील ऐतिहासिक किल्ल्यावर ७४ मीटर उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार आहे. या ध्वजाची प्रमुख तीर्थस्थळी यात्रा काढण्यात आली असून काल त्याची सुरुवात झाली. मात्र, यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘आम्ही कामं केली पण झेंडे लावले नाहीत ही चूक झाली,’ असा टोला शिंदे यांनी हाणला.

प्रा. शिंदे यांनी जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आमदार पवार यांच्यावर टीका केली. खर्डा येथील किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या भगव्या झेंड्याबद्दल शिंदे म्हणाले, ‘या किल्ल्यावर सर्वोच्च भगवा झेंडा उभारण्याचे विद्यमान आमदारांनी ठरविले आहे. या झेंड्याचा सर्वांनाच आभिमान आहे. मात्र, झेंडा उभारताना या किल्ल्याच्या विकासासाठी अडलेला निधीही त्यांनी तातडीने आणला पाहिजे. आपल्या कार्यकाळात खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांची विकास योजना तयार केली होती. त्यासाठी तीन कोटी ८६ लाख रुपये मंजूरही केले होते. मात्र, आम्ही कामं करीत गेलो. आमचे चुकले की आम्ही असे झेंडे लावले नाहीत. विद्यमान आमदार किल्ल्यावर झेंडा लावत आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा. मात्र, त्यांनी अडलेला निधीही आणावा. माझ्या काळात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली. पण सध्या शहरासह तालुक्यात रस्त्याच्या दुरावस्था मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पोस्टरबाजी करायची सोशल मिडियातून विकासाच्या गप्पा करायची एवढचे काम सध्याचे आमदार करीत आहेत,’ अशी टीकाही शिंदे यांनी केली.

रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा!

‘राज्यात करोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. मात्र, रोहित पवार मुख्यमंत्र्यांचे आणि आपल्या आजोबांचेही ऐकत नाहीत, असे दिसते. झेंड्याच्या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यासाठी त्यांनी कर्जतमध्ये मोठी गर्दी जमविली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध करोना नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशी मागणी शिंदे यांनी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर उपस्थित होते.

Source link

AhmednagarRam Shinde Taunts Rohit PawarRam Shinde Vs Rohit PawarRohit Pawarराम शिंदे विरुद्ध रोहित पवाररोहित पवार
Comments (0)
Add Comment