बॅचलर पोरांची गुन्हेगारीत ‘मास्टरी’; विशीतील तरुणांकडे १३ टोळ्यांची सूत्रे, पोलिसांसमोर नवी डोकेदुखी

पुणे : गेल्या दशकात शहरात उदयाला आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रामुख्याने विशीतील तरुणांचा सर्वाधिक भरणा असल्याचे पोलिसांच्या नोंदींवरून स्पष्ट होत आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ३२ गुन्हेगारी टोळ्यांची नोंद झाली असून, पैकी पाच टोळ्या निष्क्रिय आहेत. १३ टोळ्या विशीतील तरुणांकडून चालविल्या जात असून, त्यांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.

मोहोळच्या खुनामुळे ठिणगी

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुलनेने शांत समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून झाला. कुख्यात गुंड गणेश मारणे आणि मुळशीतील विठ्ठल शेलार यांनी कट रचून मोहोळचा खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे. या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा आढावा घेतला असता, भीषण वास्तव समोर आले आहे.

अल्पवयीनांची पावले गुन्हेगारीकडे

शहर पोलिसांनी गेल्या वर्षात (२०२३) संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) केलेल्या कारवाईत सुमारे ७० अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून आला. अडीचशेहून अधिक अल्पवयीन मुलांवर विविध गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आता १३ गुन्हेगारी टोळ्या विशीतील मुलांकडून चालविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

जुन्या टोळ्या सक्रिय

शहरात सन २०१०पर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवर ११ टोळ्यांची नोंद होती. त्यामध्ये प्रामुख्याने बंडू आंदेकर, बाबा बोडके, गजा मारणे, उमेश चव्हाण, नीलेश घायवळ, गणेश मारणे, संदीप-शरद मोहोळ, बंटी पवार, बापू नायर, अन्वर नव्वा आणि वसीम खडा यांच्या टोळ्या होत्या. या काळात पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली. त्यामध्ये मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा खून झाला. त्यानंतर विशीतील शरद मोहोळने मोहोळ टोळीची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर अन्वर नव्वा, वसीम खडा आणि शरद मोहोळचा खून झाला. त्यामुळे सद्य परिस्थितीत आंदेकर, गजा मारणे, गणेश मारणे, घायवळ, पवार आणि नायर या टोळ्या सक्रिय आहेत.

कोथरूड, वारज्यात सर्वाधिक टोळ्या

शहरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी सर्वाधिक आठ गुन्हेगारी टोळ्या कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. गेल्या दशकात बहुतांश टोळीयुद्धाचा भडका याच भागात उडाल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन टोळ्या सक्रिय आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर म्होरके ‘बाहेर’

शहरात सक्रिय असणाऱ्या प्रमुख टोळ्यांचे बहुतांश म्होरके आणि प्रमुख सदस्य ‘मकोका’ किंवा ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारागृहात होते. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर सात टोळ्यांचे म्होरके कारागृहातून बाहेर आले आहेत. शरद मोहोळचा खून आणि आंदेकर-ठोंबरे टोळीतील वाढता संघर्ष या पार्श्वभूमीवर आगामी काळ शहरासाठी डोकेदुखी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुन्हेगारी टोळ्यांचा आढावा

३२
एकूण टोळ्या

११ (४१५)
जुन्या गुन्हेगारी टोळ्या (सदस्य)

२१ (२४२)
नव्याने सक्रिय टोळ्या (सदस्य)

१३
१८ ते २९ वयोगटातील म्होरके

नऊ
३० ते ४० वयोगटातील म्होरके

सात
४०च्या पुढील म्होरके

गेल्या वर्षभरात मोठ्या संख्येने ‘मकोका’ कारवाई करून संघटित गुन्हेगारीला चाप लावला. परिणामी, ‘बॉडी ऑफेन्स’च्या गुन्ह्यांत मोठी घट झाली आहे. आगामी काळातही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गरजेनुसार, सर्व प्रयत्न करण्यात येतील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची हजेरी सुरू करण्यात आली असून, प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.- अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा

Source link

lalit patil drug casePune crime newsPune newspune police newssharad mohol caseपुणे पोलिस आयुक्तालयमकोका कारवाईसंघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा
Comments (0)
Add Comment