दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण; तीन दिवसांच्या सुट्टीतही ठाणे पालिका ‘ऑन ड्युटी’

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचे काम राज्य सरकारतर्फे राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी भागातील मराठा समाज व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारीदरम्यान केले जाणार आहे. ठाण्यामध्ये सुरू असलेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर असून आतापर्यंत दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टीच्या काळातही पालिकेचे अधिकारी-कर्मचारी ‘ऑन ड्युटी’ होते. त्यामुळे या काळात शहरात विविध प्रभाग समित्यांच्या अंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण मोहीम पूर्ण केली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने राज्य सरकारने शनिवारी महत्त्वाचे पाऊल टाकत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणाऱ्या अधिसूचनेची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना दिली. या आधीपासूनच राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनद्वारे ठाण्यात सर्वेक्षण सुरू केले होते. त्यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून २५० पर्यवेक्षक व सुमारे ४००० प्रगणक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित प्रभाग समितीचे सहायक आयुक्त हे वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर व कार्यालयीन अधीक्षक हे सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून या कामासाठी कार्यरत आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ठाणे पालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयातील झेंडावंदनचा सोहळा आटोपताच अधिकारी-कर्मचारी सर्वेक्षण कामाला लागले. शनिवार व रविवारीही हे काम सुरूच होते. सुरुवातीच्या काळात सर्वेक्षणाच्या ॲपमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने सर्वेक्षणात अडचणी येत असल्याचे

प्रगणकांकडून सांगितले जाते होते. मात्र आता सुलभरित्या हे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत दोन लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून येत्या काळात अधिक वेगाने हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मुंब्र्यात काही प्रमाणात अडचणी

मुंब्र्यात सुरू असलेल्या या सर्वेक्षणात काही प्रमाणात नागरिकांकडून अडथळा निर्माण केला जात आहे. प्रगणकांना माहिती देताना वाद घालणे, अरेरावीची भाषा करणे, त्यांना धमक्या देणे असेही प्रकार घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
माकड चावले, तर कुणाकडे उपचार घेता? मराठा सर्वेक्षणात गजब प्रश्नांची मालिका
पालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणे पालिकेमार्फत नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगणकांना सर्वेक्षणाच्या कामकाजात सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. पालिकेच्या माध्यमातून आयुक्त बांगर यांचे आवाहनपत्र विविध गृहसंकुलांना पाठवले जात असल्याने या सर्वेक्षणामध्ये सुसूत्रता येत आहे.

३१ जानेवारीचे आव्हान

येत्या तीन दिवसांत अर्थात ३१ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान पालिका कर्मचाऱ्यांसमोर आहे. गेले तीन दिवस जोडून सुट्ट्या असल्याने दैनंदिन कामकाजाचा ताण प्रशासनावर नव्हता, मात्र आता हे काम पूर्ण करताना पालिका कर्मचाऱ्यांची दुहेरी कसरत होणार आहे.

Source link

manoj jarange patilMaratha ReservationMaratha SurveyMaratha Survey questionsMaratha Survey ThaneThane municipal corporationThane newsराज्य मागासवर्ग आयोग
Comments (0)
Add Comment