वंदना के. द्विवेदी (वय २६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनौ येथील असून, तेथे एकाच परिसरात दोघांचे घर आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. त्यातूनच मागील काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंधही जुळले होते. वंदना २०२२मध्ये हिंजवडी येथे नोकरीनिमित्त आली. हिंजवडीतील एका आयटी कंपनीत ती नोकरी करीत होती. दरम्यान, ऋषभ हा गुरुवारी (२५ जानेवारी) हॉटेलमध्ये राहायला गेला, तर वंदना शुक्रवारी (२६ जानेवारी) हॉटेलमध्ये गेली. तेथे शनिवारी (२७ जानेवारी) रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभ तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्या वेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात…
वंदनाचा खून केल्यानंतर ऋषभ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास हॉटेलमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली. त्याने गोळीबार करून खून केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पळून जाणाऱ्या ऋषभला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले आहे.
पाच गोळ्या झाडूनही खबर नाही
ऋषभने वंदनावर पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. गोळीबार केल्यानंतर ऋषभ अतिशय शांतपणे हॉटेलच्या खोलीमधून निघून जात असल्याचे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहे. मात्र, पाच गोळ्या झाडूनही हॉटेलमध्ये कोणालाही खबर लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
असा लागला ऋषभ गळाला
खून करून ऋषभ मुंबईला पळून गेला. तेथे त्याच्याकडील पिस्तूल एकाने पाहिले आणि मुंबई पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये त्याने हिंजवडी येथील हॉटेलमध्ये वंदनाचा पाच गोळ्या झाडून खून केल्याची माहिती समोर आली. यानंतर मुंबई पोलिसांनी त्वरित पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाचा प्रकार समोर आला.
खुनाचे कारण अस्पष्ट…
हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती दिली; तसेच वंदना आणि ऋषभ यांच्यातील संबंधांबाबत विचारणा केली. मात्र, कुटुंबीयांनी अद्याप काहीही सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले; तसेच ऋषभने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी खून का केला, याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.