उच्चशिक्षित पत्नीला ऑस्ट्रेलियात विकायला लावली भाजी, कारमध्येही कोंडले, नागपुरात तिघांवर गुन्हा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लग्नानंतर उच्चशिक्षित पत्नीचा हुंड्यासाठी छळ करून चक्क तिला ऑस्ट्रेलियात फळभाजी विकायला लावली. ही खळबळजनक घटना नागपुरात उघडकीस आली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी उच्चशिक्षित महिलेच्या तक्रारीवरून ऑस्ट्रेलियातील आयटी कंपनीत बड्या पदावर कार्यरत तिचा पती अभिलाश (बदलेले नाव) व त्याच्या आई-वडिलाविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी हुंडाबंदी अधिनियम, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम, मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

ही ३०वर्षीय विवाहिता करिष्मा (बदलेले नाव) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. करिष्मा उच्चशिक्षित असून, ती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. मार्च २०२२मध्ये वर्धा येथे करिष्माचे अभिलाशसोबत साक्षगंध झाले. यावेळी करिष्माला मिळालेले दागिने अभिलाशच्या आईने परत घेतले. त्यानंतर अभिलाशच्या आई-वडिलांनी ‘डेस्टिनेशन वेडिंग’ची (बाहेरगावी लग्न) मागणी केली. करिष्माचे नागपुरातील पॉश सभागृहात लग्न झाले. त्यावेळी रेल्वेस्थानक ते सभागृह येण्याजाण्यासाठी वातानुकूलित बसची करण्यात आलेली मागणी करिष्माच्या नातेवाइकांनी पूर्ण केली.

लग्नानंतर २६ एप्रिलला करिष्मा, अभिलाश व त्याचे आई-वडील हॉटेलमध्ये जेवायला गेले. ‘तू आम्हाला पसंत नव्हती. परंतु अभिलाशच्या हट्टामुळे आम्ही झुकलो’, असे म्हटले. त्यानंतर अभिलाश हा करिष्माला घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला. तेथे त्याने करिष्माला मारहाण सुरू केली. त्याने चक्क करिष्माला फळभाजी विकायला लावली. यासह वेटरचेही काम करण्यास तिला बाध्य केले. एक दिवस फिरण्याच्या बहाण्याने अभिलाश हा करिष्माला कारने घेऊन गेला. अभिलाशने रस्त्याच्या मधोमध कार थांबवली.

कार लॉक करून करिष्माला आतमध्येच ठेऊन तो फिरायला गेला. सुमारे १५ मिनिटांनंतर तो परतला. करिष्माने त्याला जाब विचारला. अभिलाशने शिवीगाळ करून तिला मारहाण केली, असे करिष्माचे म्हणणे आहे. कंटाळून करिष्मा माहेरी परतली व भरोसा सेलमध्ये तक्रार दिली. येथे समेट न झाल्याने अखेर करिष्माने सीताबर्डी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Source link

crime newsdomestic violencehusband torture wifehusband wife fightNagpur newsnagpur woman torture in australia
Comments (0)
Add Comment