शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्याचप्रमाणे रिफायनरी विरोधी नागरिकांची बारसुमध्ये जाऊन भेट देणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीघेणार आहेत. त्याशिवाय, देवदर्शनही घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा दौरा बांदापासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी, ४ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आंगणेवाडी भराडी देवी दर्शन, कणकवली असा दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे हे बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण या ठिकाणचा दौरा करणार आहेत.
शिवसेनेचे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिवेशनात महाराष्ट्रभर दौरा करणार असे जाहीर केलं होतं. अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिलेल्या शब्दाचा पालन करून महत्त्वपूर्ण दौरा होणार असल्याचे म्हटले जात आहे. जेवढे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधणार आहेत. तसंच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी आणि कार्यकर्त्यांच्या मनोदय वाढवण्यासाठी ४ आणि ५ या तारखेला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन उद्धव ठाकरे भेट देणार आहे. त्यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन सिंहासनाचं पूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिव प्रेमींची इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजन केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे हे भेटणार आहेत तसेच मार्गदर्शन देखील करणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा हा अतिशय आवडता जिल्हा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मनमोकळेपणाने जिल्ह्यात फिरणार आहेत. जाहीर सभा देखील घेतली जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिलीय.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News