विजेच्या टॉवरखाली अडकून तरुणाचा मृत्यू; नंतर धक्कादायक माहिती उघड

हायलाइट्स:

  • तरूण शेतकऱ्याचा मृत्यू
  • महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला धक्कादायक दावा
  • नेमकं काय आहे सत्य?

अहमदनगर : शेतातून जाणाऱ्या विजेच्या टॉवरचा भाग कोसळून त्या खाली दबल्याने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जामखेड तालुक्यातील चुंबळी गावात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. आनंद प्रभाकर हुलगुंडे (वय २५ ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

सदर तरुण रात्रीच्या वेळी तेथे कशासाठी गेला होता, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. तर शेतात टॉवर उभारण्यासाठी सदर शेतकऱ्याचा विरोध असून रात्रीच्या वेळी तो पाडण्यासाठी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चुंबळी येथील शिवारातून महापारेषणची टॉवर लाईन गेली आहे. आष्टी ते खर्डा अशा दोन वीज केंद्रांना ती जोडते. चुंबळी येथे आनंद हुलगुंडे यांच्या शेतातून ती गेली आहे. या बदल्यात हुलगुंडे यांना नुकसान भरपाई मिळाली असली तरी कराराप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचा या टॉवरला विरोध होता, असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घटनेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. रात्रीच्या वेळी हुलगुंडे शेतातील टॉवरजवळ का गेला होता? टॉवरचा भाग खचून त्याच्या अंगावर कसा पडला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

अण्णा हजारे समर्थकांकडून नगरमध्ये नव्या आंदोलनाची घोषणा

महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे?

या घटनेबाबत महापारेषण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेगळाच दावा केला आहे. कार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितलं की, आष्टी ते खर्डा उच्चदाब लाइन चुंबळी येथून जाते. प्रभाकर हुलगुंडे यांना पिकाचं नुकसान म्हणून तीन लाख सहा हजार रुपये चेकने दिले आहेत. आमचे तेथील कामही पूर्ण झालेलं आहे. मात्र, रात्रीच्या वेळी आनंद हुलगुंडे यांनी टॉवरचे सपोर्ट कापले. त्यामुळे टॉवर एका बाजूला कलला आणि तो हुलगुंडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला आहे.

आनंद याचं गेल्याच वर्षी लग्न झालं होतं. त्याच्या मागे आई वडील, पत्नी व एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता युवक गेल्याने हुलगुंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा मृतदेह दुपारी दोन वाजेपर्यंत टॉवरमध्ये अडकलेला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महापारेषणचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दुपारी दोन वाजता पंचनामा केल्यानंतर सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Source link

Ahmednagarahmednagar news in marathiअहमदनगर न्यूजअहमदनगर पोलीसतरुणाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment