हायलाइट्स:
- काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर शरद पवारांचं टोकदार भाष्य
- पवारांची टीका काँग्रेस नेत्यांना खटकली
- नाना पटोले यांनी शरद पवारांना दिलं जोरदार उत्तर
मुंबई: एकेकाळी देशभर पसरलेल्या काँग्रेसच्या (Congress) सध्याच्या अवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेलं टोकदार भाष्य काँग्रेसच्या नेत्यांना खटकलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोणी काय बोलावं हा लोकशाहीत ज्याचा त्याचा अधिकर आहे. पण देशात आजही भाजपला काँग्रेस हाच पर्याय आहे, सामान्य जनतेलाही हे माहीत आहे,’ असं पटोले यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar’s Comment on Congress)
एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काल काँग्रेसच्या सद्यस्थितीचं विश्लेषण केलं होतं. ‘उत्तर प्रदेशच्या एखाद्या जमीनदाराच्या हवेलीसारखी सध्या काँग्रेसची अवस्था आहे. या हवेलीची रया गेली आहे, आजूबाजूचं सगळं शिवार हातातून गेलंय. पण ते स्वीकारण्याची काँग्रेसची मानसिकता नाही. काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळा विचार करायला तयार नाहीत,’ असं पवार यांनी म्हटलं होतं. पवार यांच्या या टीकेला माध्यमातून जोरदार प्रसिद्धी मिळाली.
वाचा: करोनासोबतच काही लोकांच्या मनातील द्वेषाचा रोग दूर कर; छगन भुजबळांचे बाप्पाला साकडे
पवारांच्या वक्तव्याबद्दल पटोले यांना विचारलं असता त्यांनी सावध पण सूचक प्रतिक्रिया दिली. ‘शरद पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काही फार बोलायचं नाही असंच ठरलं आहे. पण त्यांनी पक्षावर प्रतिक्रिया दिलीय, असं म्हणत पटोले यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘काँग्रेसनं कधी जमीनदारी केली नाही. हा काही जमीनदारांचा पक्ष नाही. उलट काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली, त्यांना ताकद दिली पण त्यांनीच काँग्रेसचा घात केला. राखणदारांनीच जमीन चोरली. डाका घातला. त्यामुळं ही परिस्थिती झाली असेल असं पवार साहेबांना म्हणायचं असेल,’ असं पटोले म्हणाले. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा: ‘आमचं चुकलंच, आम्ही कामं केली, पण झेंडे लावले नाहीत’
‘दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया देऊ नयेत, असं आम्ही लहान माणसं मोठ्या व्यक्तींना सांगू इच्छितो. प्रत्येकाचं स्वत:चं मत असतं, पण २०२४ नंतर देशात काँग्रेसचा पंतप्रधान बनेल हे निश्चित आहे. मोदींचं सरकार ज्या पद्धतीनं देश विकायला निघालंय, त्यामुळं लोकांमध्ये तीव्र रोष आहे. भाजपला पर्याय काँग्रेसच आहे हे सामान्य जनतेला कळून चुकलंय. तरीही अशा प्रतिक्रिया देऊन काँग्रेसचं नेतृत्व खच्ची करण्याचा प्रयत्न होतोय, तो आता खपवून घेतला जाणार नाही,’ असा अप्रत्यक्ष इशाराही पटोले यांनी दिला.
वाचा: ससून रुग्णालयात धक्कादायक प्रकार; नर्सच्या वेषात महिला आली आणि…