काय प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी एका रुग्णाच्या दोन्ही पायांमध्ये जळजळ होऊ लागली होती. काही काळाने ही वेदना हातापायांमध्ये पसरली. त्या रुग्णाला उभे राहणेही कठीण होऊ लागले. चालताना त्यांचा तोल जाऊ लागला. तसेच अनेक सहजसोपी कामे करण्यामध्येही त्यांना अडचणी येऊ लागल्या. शरीराच्या वरच्या भागामध्येही त्यांना वेदना जाणवू लागल्या. हातापायांनाही सूज दिसायला लागली. डॉक्टरांच्या सल्लानुसार केलेल्या चाचण्यांमध्ये रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्याचे तसेच आयजीजी पातळीमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले होते.
या रुग्णाच्या शरीरातील प्रोटीन तसेच थ्रोम्बोसायटोसिस, क्रिएटिनिन पातळीमध्ये वाढ झाली होती. नसांच्या वैद्यकीय तपासण्यांमधून मज्जातंतूशी संदर्भातील आजाराचे निदान झाले. निश्चित निदानासाठी पीईटी स्कॅन केले तेव्हा नितंबाच्या भागात अनपेक्षित वाढ दिसून आली.
यानंतर या रुग्णाला जसलोक रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयाचे इमेजिंग अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचे संचालक डॉ. श्रीनिवास देसाई यांनी बायोप्सी केल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशींमुळे एका प्रकारचा ट्यूमर झाल्याचे दिसून आल्याचे सांगितले. या ट्यूमरमुळे रक्तातील विशिष्ट प्रोटीनमध्ये असामान्य वाढ होत होती. त्याचा परिणाम मज्जातंतूवर झाला होता. पीओईएमएस सिंड्रोमच्या या स्थितीमध्ये मज्जातंतूशी संबधित समस्या या विशिष्ट ट्यूमरशी संलग्न होत्या. हा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. या प्रकारच्या ट्यूमरचे व्यवस्थापन करणे, प्रोटीनच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले.
अनेकदा वैद्यकीय तज्ज्ञांनाही यासंदर्भातील माहिती नसते त्यामुळे ट्यूमर असल्याची शक्यता पडताळून पाहिली जात नाही. यासंदर्भात माहिती देताना जसलोक रुग्णालयाच्या कन्सल्टंट न्यूरोलॉजी आणि न्यूरोमस्कुलर विशेषतज्ज्ञ डॉ. विनया भंडारी यांनी वेळेवर उपचार आणि दुर्मिळ मज्जासंस्थेसंदर्भातील आजारासंदर्भात जागृती असणे गरजेचे असल्याचे सांगितले. शरीराला एखादा त्रास होत असल्यास वा सातत्याने काही लक्षणे दिसत असतील तर त्यासंदर्भात वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘कोणत्याही मज्जासंस्थेसंदर्भात आजारव्यवस्थापन आणि त्याच्या लक्षणांवर योग्य उपचारांची गरजही तितकीच महत्त्वाची आहे’, असे न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. जॉय देसाई यांनी सांगितले.