डाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, मोठ्यांच्या नादाला लागू नका, मी हक्काचा माणूस: लंके

पारनेर (अहमदनगर) : मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील. लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही. पण इथे काहीही अडचण आली तरी मी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, अशा शब्दात पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांचा समाचार घेतला. त्याचवेळी पारनेरमध्ये प्रतिस्पर्ध्यांची जिरवली आता दुसऱ्यांची जिरवायची आहे, असे म्हणत येणाऱ्या काळातील आपले राजकीय विरोधक विखेच असतील, याचे इरादेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश लंके आज अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील गारखिंडी आणि कळस गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गावकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात फटकेबाजी करताना लंके यांनी विखे बाप लेकाला लक्ष्य केले. दिवाळीच्या मुहूर्तावर विखे पाटलांनी अहमदनगर उत्तरेत साखर आणि डाळ वाटप केली होती. त्यावरून विविध राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. सुजय विखे दक्षिणेतून खासदार झाले आणि उत्तरेत साखर वाटप केली, अशी टीका त्यांच्यावर झाली. त्यामुळे यावेळी ‘राम मंदिरा’चा मुहूर्त गाठून विखेंनी दक्षिणेत यथायोग्य साखर-डाळ वाटपाचे कार्यक्रम सुरू केले. हाच धागा पकडून निलेश लंके यांनी विखेंवर तोंडसुख घेतले.

दाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, मोठ्या लोकांच्या नादाला लागू नका

मी आमदार झालो त्याआधी सहा महिने ‘ते’ खासदार झाले, त्यांनी गावात किती कामे केली? एक रुपयाचे काम दिले नाही. मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील, थेट पाच वर्षांनीच दाळ गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील. लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही. दाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मोठ्या लोकांच्या जास्त नादाला लागू नका. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. चुकलो तरी माझा कान धरून मी चुकलोय, असे तुम्हाला सांगता येईल. फक्त स्टेजवर भाषणे करणाऱ्या कर्तव्यशून्य लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, अशी टीका लंके यांनी विखेंवर केली.

तुमचं काम मार्गी लावणार, गावकऱ्यांना शब्द

माझ्याकडे कधीही हक्काने या, तुमच्या सेवेसाठी मी सदैव आहे. फक्त आचार संहितेत तुम्ही सांगितलेलं काम व्हायचं नाही. माझा आणखी सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. या कार्यकाळात तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण करेन, अशी ग्वाही लंके यांनी यावेळी गावकऱ्यांना दिली.

Source link

Nilesh Lankenilesh lanke vs vikhe patilradhakrishna vikhe patilsujay vikhevikhe patil distribute sugar dalनिलेश लंकेविखे पाटीलसुजय विखे पाटील
Comments (0)
Add Comment