कोरोनाच्या काळामध्ये सगळीकडेच लॉकडाऊन होता. संपूर्ण जग या काळात ठप्प झालेले होते. या दोन वर्षाच्या काळात त्यावेळी नऊ वर्षाच्या कृष्णाने मोबाईल तसेच धार्मिक ग्रंथातून गीतेचे तब्बल सातशे श्लोक मुखोदगत केले होते. कृष्णाने हे सर्व श्लोक केवळ ५५ मिनिट आणि ५१ सेकंदामध्ये म्हणत एक विक्रम केला आहे. कृष्णाच्या घरची परिस्थिती हलाखीची असून विठ्ठल मंदिरामध्ये त्याची आई देवाला नैवेद्य बनविण्याची सेवा करते. तर वडील मिळेल ते काम करून संसार चालवतात. मोबाईलवर लर्न गीता डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन कृष्णाने गीतेच्या श्लोकाचे शिक्षण घेतले.
लॉकडाऊनच्या काळात कृष्णाने गीता शिकण्याचे काम केले. आज केवळ ५५ मिनिटात तो संपूर्ण ७०० श्लोक म्हणून दाखवतो. कृष्णाची गीतेतील आवड पाहून उत्तरप्रदेशातील इस्कॉन गुरुकुलने त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली. येथे कृष्णा सध्या शिक्षण घेत आहे. गीतेच्या श्लोक पाठांतराचे अगोदरच ७३ मिनीटांचे एक वर्ल्ड रेकॉर्ड होते. मात्र त्या पेक्षा कमी वेळात सर्व श्लोक म्हणण्याचा त्याने सराव केला. सरावानंतर अवघ्या ५५ मिनीट आणि ५१ सेकंदात संपूर्ण भगवतगीता त्याने म्हणून दाखविली. त्याचा हा तयार केलेला व्हिडिओ त्याच्या आचार्यांनी वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविला होता.
या व्हिडिओची दखल घेऊन तेथील पदाधिकारी लवकरच इकडे येणार असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांनी दिली. आता ही मंडळी येथे येऊन त्याच्या या गीता पठण कामगिरीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेणार आहेत. कृष्णाच्या मदतीला आता अनेक जण पुढे येऊ लागले असून गिनीज बुक मध्ये नोंद करण्यासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी कृष्णाचे कुटुंब धडपडू लागले आहे.