सर्वत्र मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यवतमाळ तहसीलदार यांच्या आदेशाने शहरातील लोकनायक अणे विद्यालयातील शिक्षक अमोल बाबरे आणि संदीप पत्रे हे सोमवारी सर्वेक्षण करण्यासाठी जिजाऊ नगरात गेले होते. यावेळी एका तरुणाने त्यांच्या अंगावर धाव घेवून शिवीगाळ केली.
एवढेच नव्हे तर मारहाण देखील केली. दरम्यान, शिक्षकांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर टाकून थेट शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी चौकशी सुरू केली. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक शिक्षक जमा झाले होते.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्व्हे करण्यास गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी अभिनेत्री केतकी चितळेपाठोपाठ अभिनेता पुष्कर जोग यानेही उद्धट वर्तन केले. जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या, अशी वादग्रस्त पोस्ट पुष्कर जोग याने समाज माध्यमांवर लिहिली. त्याच्या या भूमिकेवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून पुष्कर जोग याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच शासकीय काम इमाने इतबारे करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाणीची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा ‘दि म्युनिसिपल युनियन’ या संघटनेने पुष्कर जोग याचा निषेध व्यक्त केला.