मुंबई येथे आज राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी भाजपात प्रवेश करत जय श्रीराम म्हणत भाजपवासी झाले आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजयदादा आल्यामुळे आता गिरीभाऊ गरुड झेप घेणार. गरुड आल्यामुळे गरुड झेप गिरीश महाजन तुम्ही घेणार आहात. गिरीश महाजन यांना पक्षनेतेची जबाबदारी दिली ती संपूर्ण चांगल्याप्रकारे पार पाडण्याची कामगिरी त्यांनी केली. तसेच गिरीश महाजन यांना अजून दोन-तीन काम त्यांच्या मागे लावून देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोण आहेत संजय गरुड?
जामनेर विधानसभा मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजयदादा गरूड हे दोन राजकीय विचारधारांचे दोन विरोधी नेते होते. संजय गरूड यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अलीकडे शरद पवार गटाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांना सातत्याने आव्हान देण्याचे काम त्यांनी केले आहे. गिरीश महाजन यांचे वर्चस्व भेदण्यास त्यांना अपयश आले असले तरी तगडी फाईट देण्यासाठी सक्षम असणारे दिग्गज नेते म्हणून संजय गरूड यांची ख्यात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील ते मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे राहतील, अशी शक्यता होती. परंतु काही दिवसांपुर्वीच ते भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
जामनेरची राजकीय परिस्थिती बदलणार?
दरम्यान संजय गरूड हे आपल्या समर्थकांसह मुंबईतील यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रातील भव्य कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलल्याचे पहायला मिळाले. आगामी निवडणुकीमध्ये आता संजय गरूड हे मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे. तसेच गरूड यांना विधानसभा लढायला सांगून जळगावमधून महाजन लोकसभेला उभे राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच संजय गरुड हे त्यांच्या समर्थकांसह भाजप प्रवेश केल्याने जामनेर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.