अनुष्का केतन गावडे ( वय २५) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी मंचर पोलिसात सासरा गुलाब सखाराम गावडे, सासू कल्पना गुलाब गावडे, पती केतन गुलाब गावडे, भाया डॉ.कांचन गुलाब गावडे व जाऊ डॉ. शुभांगी कांचन गावडे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुष्का हिचा विवाह केतन गावडे याच्याशी १ एप्रिल २०२१ रोजी झाला होता. नवऱ्या मुलाच्या मागणी प्रमाणे मुलीच्या आई वडिलांनी सर्व गोष्टी दिल्या. धुमधडाक्यात लग्न लावले. मात्र, लग्न झाल्यानंतर अनुष्काला फक्त तीन ते चार महिने सुखात नांदवण्यात आले. त्यानंतर तिचा पती असलेला केतन याने अनुष्काला तू तुझ्या घेऊन गाडी आणण्यासाठी पैसे घेऊन ये, असे म्हणत तिला त्रास देऊ लागला. तसेच तिला घरी दारू पिऊन येऊन मारहाण करू लागला. या संदर्भात मृत अनुष्का ही आपल्या माहेरच्या लोकांना वेळोवेळी कल्पना देत होती. मात्र, काही व्हायला नको म्हणून आई वडील पुन्हा तिला सासरी नांदवण्याठी पाठवत होते.
पण अनुष्का हिला तुला घरात नीट स्वयंपाक येत नाही, कपडे धुता येत नाही ,झाडून घेता येत नाही, लग्नात आमचा मानपान नीट केला नाही, हुंडा दिला नाही. माहेरावरून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन ये असे म्हणून तिचा वारंवार छळ करण्यात आला.
२४ जानेवारी या दिवशी अनुष्का व पती केतन हे जेवण्यासाठी फाकटे येथे आले होते. यानंतर नेहमीप्रमाणे तिने वडिलांना फोन केला होता. त्यानंतर 26 जानेवारीला तिची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर कुटुंबीय मंचर उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्यावेळी अनुष्का हिच्या नाका तोंडातून रक्त व फेस आला होता. तिचे शरीर काळे निळे पडले होते. अनुष्काला काय झाले असे विचारले असता पती व सासू-सासरे यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
माहेरकडच्या लोकांना संशय आल्याने आपली मुलगी अनुष्का गावडे हिचे शवविच्छेदन पुणे येथील ससुन रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यानंतर तिचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची फिर्याद अशी आई स्वाती अतुल बांगर यांनी मंचर पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सासू-सासरे, पती भाया व जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे करत आहेत.