सिलेंडरमध्ये अधिकृतपणे गॅस भरून त्याची विक्री करण्यासाठी परवाना आवश्यक असतो. मोजक्या पेट्रोलियम कंपन्यांनाच गॅस रिफिलींगची परवानगी आहे. असे असतानाही सातपूर बाजारपेठेत फुग्यात हवा भरावी अशा सहज पद्धतीने चार-सहा किलोच्या घरगुती सिलेंडर्समध्ये गॅस भरून देण्याचा ‘उद्योग’ सर्रास सुरू आहे. सातपूरची प्रवेशकमान आणि त्र्यंबकेश्वर रोडपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बाजारपेठेत भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी कामगार, मजूर यांचा राबता असतो. कमानीजवळ मिठाई विक्रीची दुकाने असून, तेथील भट्ट्या नेहमी सुरू असतात. या विक्रेत्यांपासून हाकेच्या अंतरावर छोट्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅस भरून दिला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. या विक्रेत्यांनी विक्रीसाठी खुलेआम सिलेंडर ठेवली असून, मागणी केल्यास जागेवरच त्यामध्ये गॅसदेखील भरून दिला जातो. वर्दळीच्या ठिकाणी होणाऱ्या गॅस रिफिलींगमुळे येथे स्फोट किंवा आगीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि शनिवारी बाजाराच्या दिवशी येथे रिकाम्या सिलेंडर्समध्ये गॅस भरून घेण्यासाठी लोकांची रिघ लागलेली असते. साधारणत: चार किलो गॅस भरून देण्यासाठी ५०० ते ५५० रुपये आकारले जातात. संबंधित व्यावसायिकांकडे पोलिस आणि पुरवठा विभागाकडून डोळेझाक होत असल्याने अन्य व्यावसायिक देखील गॅस रिफिलींगच्या व्यवसायाकडे वळू लागले आहेत.
रिफिलींगसाठी मजुरांची गर्दी अधिक
सातपूर ही कामगार वसाहत आहे. मोलमजुरी करणारा हा वर्ग मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्यास आहे. विशेषत: द्राक्षबागांमध्ये काम करणारा मजूर मराठवाड्यासह परराज्यातून आलेला असतो. याशिवाय कारखान्यांमध्ये हेल्पर म्हणून काम करणाऱ्या मजुरांकडेही अधिकृत गॅस कनेक्शन नसते. त्यामुळे असे लोक स्वयंपाकासाठी गॅस शेगडी आणि चार-सहा किलोचे छोटे सिलेंडर खरेदी करतात. या सिलेंडरमधील गॅस संपल्यास रिफिलींगसाठी सातपूर बाजारपेठेत येतात. त्यामुळे हा व्यवसाय तेजीत असून, दुर्घटना घडण्यापूर्वी अवैध गॅस रिफिलींग रोखण्यासाठी पोलिस पुढाकार घेणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
– बाजारपेठांत पदोपदी सिलिंडरची अनधिकृत भरणा केंद्रे
– पोलिस-पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून उद्योग
– घरगुती-व्यावसायिक टाक्यांचा सर्रास वापर
– चार किलोच्या गॅससाठी ५०० ते ५५० रुपयांची आकारणी
– सातपूर, पंचवटी, सिडकोसह उपनगरांत व्यापार
मटा भूमिका
भरल्या बाजारात गॅस रीफिलिंगचे अनधिकृत उद्योग करून स्वत:सह येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. हजाराचे दोन हजार करण्याच्या नादात काही व्यावसायिक नागरिकांची सुरक्षा धोक्यात घालत आहेत. दिवसाढवळ्या हा काळाबाजार सुरू असताना पोलिस, पुरवठा विभागासह इतर जबाबदार विभाग नेमके करतात तरी काय? भाडेकरू वा परप्रांतीयांना या मिनी सिलिंडरचे वितरण केले जात असले तरी त्यासाठी बाजारपेठेच्या सुरक्षेला वेठीस धरण्याचे प्रकार थांबायला हवेत. अशा लोकांच्या इंधनासाठी इतर सक्षम पर्याय शोधायला हवेत.