‘पन्नास वर्षे झाली, सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते. मात्र, ज्या बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली, त्यातल्या २४ गावांत शेतीला पाणी नाही की,पिण्याचे पाणी नाही. अशीच अवस्था जुन्नर तालुक्यात आहे. येथे पाच धरणे असूनही अणे पठारावर पाणी नाही. तालुक्यातील जनता पाण्यासाठी पायपीट करत असून, याच्या पेक्षा पवार कुटुंबीयांचे मोठे पाप कोणतेच असू शकत नाही,’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. बेल्हे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घराणेशाहीवरदेखील पडळकर यांनी या वेळी टीका केली. जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या आणि पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्या आशा बुचके यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कार समारंभावेळी पडळकर बेल्हे येथे आले होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जुन्नर तालुकाध्यक्ष संतोष तांबे; तसेच आशा बुचके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, ‘काँग्रेसने कायम घराणेशाहीने गांधी घराण्यातले राष्ट्रीय अध्यक्ष केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही अध्यक्ष बदलला नाही. दोन वर्षे झाली, तरी एसटी कामगारांना पगार नाही. असे असतानाही येथील कामगार संघटनांनी कधीही मोर्चा काढला नाही. कारण, या संघटनादेखील पवारांच्या घरी पाणी भरतात. बैलगाडा मालकांच्या विरोधातील गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आले नाहीत.’
गणेश भेगडे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ‘संजय राऊत हे पैसे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करतात,’ असा आरोप भेगडे यांनी केला.