सध्याच्या घडीला हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून ठाकरे गट लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागल्याची चर्चा सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झाले आहेत. विकास कामांचा धडाका, त्यासाठी निधीची तरतूद, कामांचे लोकार्पण, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार राजकीय पक्षांकडून सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून शिंदे गट व अजित पवार गटाकडून देखील आपली ताकद दाखवून देण्यासाठी धडपड सुरु आहे.
त्यातच विधानसभेची देखील गणिते पक्षांकडून आखली जात आहेत. यासोबतच नुकताच विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राज्याच्या राजकारणात काहीसा सक्रिय झालेला दिसला. त्यातही आत्तापर्यंत शांततेच्या भूमिकेत असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मतदार संघाच्या दौऱ्यावर उतरल्याचे दिसून आले आहे.
संपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पहिलाच दौरा राज्यात केला. तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात. याठिकाणी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटाची ताकद दाखवून देण्यात आली आहे. या संपर्क दौऱ्यादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन देखील जनतेला केले होते.
यानंतर आता शहरात उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे. डोंबिवली स्टेशन परिसर, चौक आदी ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये हुकूमशाही या शब्दाला हायलाईट करत हुकूमशाही उलथविण्यासाठी तुमचं एक मत महत्वाचे आहे, असा संदेश देण्यात आला आहे. तसेच देशात लोकशाही आहे, परंतु सत्ताधाऱ्यांची वाटचाल ही हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे हा संदेश देण्यासाठी तुझं हे मतदान शेवटचं ठरु नये असे सूचक वक्तव्य त्या संदेशात करण्यात आले असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्हाला केवळ मतदारांना जागरुक करायचे आहे त्यासाठी हे बॅनर लावल्याचे त्यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News