एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र त्यानंतर आता शिवसेनेबाबत नवा वाद समोर आला आहे. शिंदे गटाचे किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे लॉग इन आणि पासवर्ड चा गैरवापर सुरू असल्याची तक्रार दिली. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी संबंधित अकाऊंट फ्रीज करावे लागणार असल्याचं शिंदे गटाला सांगितले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित बँक, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखा या माध्यमातून आठ दिवसात चौकशी करण्यात येईल. तसेच त्यानंतर या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा असल्याचे सांगितले आहे. त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. यानंतरही शिवसेना पक्षाच्या आयकर विभागाशी संबंधित लॉग इन आणि पासवर्ड आमच्याकडे दिला नाही. यापूर्वी अकाऊंटचा ताबा हा अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्याकडे होता. मात्र आता पक्ष आमच्याकडे आहे. या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड चा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉग इन, पासवर्ड हस्तांतरित न केल्याने आणि गेल्या काही महिन्यात त्यातून काही गैरव्यवहार झाले असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी किरण पावसकर यांनी केली.
या प्रकरणी चौकशी करून आठ दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस आयुक्त यांनी दिले आहे. तसेच ही चौकशी निःपक्षपाती करण्यासाठी बँक अकाऊंट फ्रीज करावे लागण्याची शक्यता विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News