शेती करण्यासाठी त्यांचे वडील व पत्नीसह ते कोथूळ या ठिकाणी वास्तव्यास आले होते. दि २९ जानेवारी रोजी योगेश सुभाष शेळके हे जेवण करुन झोपले असता मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कोणीतरी दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्याने योगेश शेळके यांची पत्नी आरती शेळके यांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्यांना दरवाजासमोर चार सडपातळ इसम काळे कपडे घातलेले व तोंडाला कापड बांधलेले असून त्यांच्या हातात कोयता घेऊन उभे असलेले दिसले. आरती शेळके यांनी त्यांना पाहून आरडाओरडा करायला सुरूवात केली. यावेळी यापैकी एकाने आरती शेळके यांच्या गळ्याला कोयता लावून, “तू काही बोलली, तर तुला मारुन टाकीन”, असा दम दिला व त्यातील तीनजण योगेश सुभाष शेळके झोपलेल्या ठिकाणी जाऊन काहीएक न बोलता त्यांच्या हातातील कोयत्याने योगेश शेळके यांच्या गळ्यावर, हाताचे पंजावर, उजव्या पायावर वार करुन गंभीर दुखापती करत त्यांचा खून केला.
योगेश सुभाष शेळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. यानंतर हे चारही अनोळखी इसम तेथून पळून गेले, असल्याची फिर्याद आरती शेळके यांनी पोलीस ठाण्यात दिली. आरडाओरड होण्याच्या आवाजाने आमचे शेजारी असणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण केले. अज्ञात चोरट्यांनी हल्ला केल्यावर घरात मयताची पत्नी ,वडील, मुलगा व मुलगी असे सर्वजण असताना फक्त एकावरच हल्ला करून ठार केले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची शंका अधिक बळावत आहे.
मयत योगेश शेळके काल घरापासून काही अंतरावर एका झाडाखाली दिवसभर आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सोमरस प्राशन करत होता. त्यामुळे या पार्टीत कोणाच्या भावना दुखावेल अशी भाषा वापरली गेली काय? तसेच बोलताना एकाद्या शब्दाचा राग आल्यावर घटना घडली आहे का? याचाही पोलिसांकडून शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. खुनाची माहिती मिळाल्यावर बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावातील एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन दुचाकीस्वार अवेळी जाताना दिसत आहेत. त्यामुळे सदर खून प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.